‘महाज्योती’ला ७०० कोटी आणि विमुक्त भटक्यांसाठी ५०० विशेष शिबिरांचे नियोजन; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
OBC Welfare Fund अंतर्गत राज्यातील १८ पगड जाती आणि ओबीसी घटकांना न्याय देण्यासाठी विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व वसतिगृह बांधकामासाठी तब्बल ६,८४० कोटी रुपयांच्या निधीची शिफारस करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महसूलमंत्री तथा ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली १८ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे आणि ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ओबीसी समाजाचे हक्क मिळवून देण्यासाठी उपसमिती सातत्याने कार्यरत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या एनएसपी (NSP) पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रक्रियेसाठी १,८०० कोटी रुपये अपेक्षित असताना सध्या केवळ ८३ कोटींची तरतूद असल्याने हा निधी तात्काळ वाढवून देण्याची आवश्यकता बैठकीत अधोरेखित करण्यात आली. तसेच ‘महाज्योती’ संस्थेसाठी ७०० कोटी रुपयांच्या निधीसह पुणे येथील प्रस्तावित संकुलासाठी जागा देणे आणि अनुशेष भरून काढण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
OBC Welfare Fund: वसतिगृह बांधकाम आणि भटक्या जमातींसाठी विशेष मोहीम
वसतिगृह उभारणीच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात १०० आणि विभागीय जिल्ह्यांत २५० मुला-मुलींची वसतिगृहे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून, एमएसआयडीसीने (MSIDC) तयार केलेल्या आराखड्यानुसार मार्चपासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. सर्व वसतिगृहे पर्यावरणपूरक आणि सौरऊर्जेचा वापर करून बांधावीत, तसेच ३० डिसेंबरपर्यंत प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून मार्चच्या अर्थसंकल्पात १० नवीन वसतिगृहांसाठी तरतूद करावी, अशा सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या. बैठकीतील इतर प्रमुख निर्णय खालीलप्रमाणे आहेत:

विमुक्त जाती, भटक्या जमाती (VJNT) आणि भटक्या समाजातील ४३ जातींना हक्काची ओळख मिळवून देण्यासाठी ६, ७ आणि ८ जानेवारी २०२७ रोजी राज्यभरात सुमारे ५०० विशेष शिबिरे आयोजित करून १०० टक्के जन्माचे दाखले व आधार कार्ड दिले जातील, ज्यासाठी प्रत्येक सर्कलला १० हजार रुपये दिले जातील.
ओबीसींच्या विविध योजनांमार्फत बांधण्यात आलेल्या घरकुलांवर दोन महिन्यांच्या आत लाभार्थ्यांच्या नावाचे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गोरेगाव येथील दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या न्यूझीलंड वसतिगृहात इतर मागास बहुजन कल्याण विभागाला ८० खोल्या देण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘ए-कॅप’ची (A-CAP) नस्ती अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली असून, लक्ष्मण हाके यांच्या मागण्याही पूर्ण केल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवण्यासोबतच ९ टक्के आरक्षणाचा नव्याने अभ्यास करून सांख्यिकी विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
महायुतीत एकोपा, विरोधकांवर टीका आणि सातारा जिल्हा बँक राजकारण
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीतील समन्वयाबाबत स्पष्ट भूमिका मांडली. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत तिन्ही घटक पक्षांनी एकमताने निर्णय घेतला असून, यापुढे आमदार, खासदार किंवा पदाधिकाऱ्यांनी मित्रपक्षांच्या नेत्यांवर जाहीर टीका करू नये, असे ठरवण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर विरोधकांकडून किंवा सोशल मीडियावर खालच्या पातळीवर टीका झाल्यास तिन्ही पक्ष एकत्रितपणे मैदानात उतरून सडेतोड प्रत्युत्तर देतील, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेबाबत सुप्रिया सुळे यांनी ते रोहित पवारांचे व्यक्तिगत मत असल्याचे स्पष्ट केले असले तरी शरद पवार यांनी दिलेले संस्कार रोहित पवारांनी पाळावेत, विकासाच्या राजकारणात मिठाचा खडा टाकू नये आणि देवेंद्र फडणवीस यांची माफी मागावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली. यासोबतच शायना एनसी यांच्याकडून अनावधानाने घडलेल्या घटनेचे राजकारण करत संजय राऊत यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेचा त्यांनी निषेध केला. तसेच, सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने अध्यक्षपदी उदयसिंह पाटील यांना दिलेल्या संधीबाबत विचारले असता, जिल्हा परिषद निवडणुकीपासून स्थानिक नेत्यांमध्ये निर्माण झालेले मतभेद दूर करण्यासाठी महायुतीचे प्रमुख नेते लवकरच एकत्र बसून समन्वय साधतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.













