चिपळूण वन विभागाची कौशल्यपूर्ण कामगिरी; गेल्या तीन-चार महिन्यांतील दुसरी यशस्वी सुटका
Black Panther Rescue Ratnagiri च्या यशस्वी मोहिमेअंतर्गत विहिरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याच्या (ब्लॅक पॅंथर) पिल्लाला वन विभागाच्या बचाव पथकाने अत्यंत धाडसाने आणि कौशल्यपूर्ण कामगिरी करत सुखरूप बाहेर काढले. वन विभागाच्या या कामगिरीचे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष कौतुक केले असून, चिपळूण येथील वन विभागाच्या कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन मोहिमेत सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
दुर्मीळ वन्यजीव असलेल्या ब्लॅक पॅंथरची सुटका करताना वन विभागाच्या पथकाने अत्यंत सावधगिरीने मोहीम राबवली. बिबट्या स्वभावतः आक्रमक असतानाही या संपूर्ण बचाव कार्यादरम्यान त्याने कोणत्याही नागरिकाला अथवा कर्मचाऱ्याला इजा केली नाही. वन विभागाच्या पथकानेही पिल्लाला कोणतीही इजा न पोहोचवता सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढून जीवदान दिले. या मोहिमेमुळे वन विभागाच्या तत्परतेसोबतच वन्यजीव हाताळण्यातील अनुभव आणि कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Black Panther Rescue Ratnagiri: जिल्ह्यातील दुसरी यशस्वी घटना
ब्लॅक पॅंथर हा अत्यंत दुर्मीळ वन्यजीव असून त्याचे दर्शन फार कमी ठिकाणी घडते. विशेष म्हणजे, गेल्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात ब्लॅक पॅंथर आढळण्याची आणि वन विभागाने त्याला सुरक्षितपणे वाचवण्याची ही दुसरी घटना आहे. सलग अशा घटनांमध्ये यशस्वी सुटका केल्याने रत्नागिरी वन विभागाचे पथक संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल असल्याचे पुन्हा सिद्ध झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

चिपळूण येथील या अभिनंदन प्रसंगी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपविभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वन अधिकारी प्रियांका लगड यांच्यासह वन विभागाचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.













