रत्नागिरी : ‘आरटीओ’तील कामकाज संपामुळे ठप्प

रत्नागिरी : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन विमाग कर्मचारी संघटनेने दि. २४ सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारला. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनाही यामध्ये सामिल झाली. या संपाचा कामकाजावर मोठा परिणाम होऊन संपूर्ण कामकाज ठप्प झाले. कर्मचाऱ्यांनी आरटीओ कार्यालयाबाहेर आकृतिबंधाच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी निदर्शने केली.

या संपाबाबत संघटनेने यापूर्वीच परिवहन आयुक्तांना नोटीस देण्यात आली होती. मोटार वाहन विभागासाठी शासनाने आकृतिबंध २३ सप्टेंबर २०२२ ला शासननिर्णय निर्गमित केला. कर्मचारी संघटनेने सहा वर्षे केलेल्या दीर्घ लढाईला यश आले.

अत्यंत नगण्य अशा पदोन्नतीच्या संधी असल्याने या शासन निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते; परंतु मागील २ वर्षात काही तांत्रिक बाबींचा बाऊ करून आकृतिबंधाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ केली जात आहे. आकृतिबंधाची योग्य अंमलबजावणी न करता त्याचा आधार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात महसूल विभाग स्तरावरील बदल्यांचे सूत्र स्वीकारून प्रशासनाने महसुली बदल्या केल्या. याला ठाम विरोध करण्यात आला.

महसूली विभाग स्तरावरील बदल्यांमुळे कर्मचारी वर्गास पदोन्नती तसेच सेवाविषयक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे कर्मचारी भयभीत व संतप्त झाले असून तीव्र नाराजी आहे. त्यामुळे संघटनेच्यावतीने या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्रातील कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. येथील आरटीओ कार्यालयातील आठ ते दहा कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 25-09-2024