रत्नागिरी : लांजा तालुक्यातील सापुचेतळे येथील वडापाव विक्रेत्याचा जबर मारहाणीमुळे जखमी झाल्याने उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला. या प्रकरणात घातपात असल्याचा मृताच्या नातेवाईकांनी वर्तवला आहे. संदीप फटकरे (मूळ रा. चांदोर, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या विक्रेत्याचे नाव आहे.
लांजा तालुक्यातील सापुचेतळे येथे वडापावचा व्यवसाय करणारा संदीप फटकरे याला सोमवारी रात्री सापुचेतळे येथे बेदम मारहाण करण्यात आल्यामुळे तो बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. सापुचेतळे येथे आई-वडिलांसह तो वडापावचा धंदा करीत होता. त्यामुळे त्या परिसरात त्याची ओळख होती. सोमवारी सायंकाळी पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे त्याने आई वडिलांना घरी लवकर पाठविले होते. त्यानंतर त्याने आपली वडापावची गाडी उशिरा बंद केली, असे परिसरातील लोक सांगतात. वडापावची गाडी बंद करून आपल्या मित्रांसोबत तो बाहेर पडला होता. त्यानंतर मित्र त्याला सोडून निघून गेले. काही कालावधीनंतर या परिसरात तो बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याच्या कमरेखाली जबरदस्त मार बसला होता. त्यामुळे लघवीच्या ठिकाणाहून रक्तस्त्राव झाल्याचे सांगण्यात आले. या अवस्थेत त्याला कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते; मात्र तो शुद्धीवर आला नाही व त्यातच त्याचे मंगळवारी निधन झाले.
दरम्यान, कोणीतरी अज्ञातांनी त्याला जबर मारहाण केली असावी, अशी शक्यता त्याच्या नातेवाईकांनी वर्तविली आहे. हा घातपात असल्याची चर्चा सापुचेतळे, चांदोर, वाडीलिंबू, दोन आंबा, उपळे, आगवे, निरुळ, पावस परिसरात सुरु आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 25-09-2024