रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक मंगळवारी पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यात फक्त ७७ मतदार होते त्यातील सायंकाळपर्यंत अवघे ४३ जणांचे मतदान झाले. हजारो नावे नोंदवूनही फक्त मतदार यादीत जिल्ह्यात ७७ नावेच आल्याने यात काहीतरी गोलमाल असल्याचा आरोप युवासेना उबाठाचे तालुकाधिकारी प्रसाद सावंत यांनी केला आहे.
मुंबई विद्यापिठाच्या सिनेटच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. रविवारी होणारी मतदान प्रक्रिया ऐनवेळी विद्यापिठाने रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने विद्यापीठ प्रशासनाला फटकारत ही प्रक्रिया मंगळवारी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी ही प्रक्रिया पार पडली.
या निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्हयात एकच मतदान केंद्र गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे होते. या ठिकाणी फक्त ७७ मतदार होते.
सायंकाळी पाचपर्यंत मतदान पार पडले. यावेळी अनेक नावे मतदान यादीतून वगळण्यात आल्याचे दिसून आले. नव्याने अर्ज केलेल्यांचाही यादीत समावेश झालेला नव्हता. लांजा-राजापूरचे माजी आमदार राजू साळवी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांचीही नावे मतदार यादीतून गायब झाली होती. याबाबत विक्रांत जाधव यांनीही विद्यापीठ प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
मतदान प्रक्रिया सुरू असताना शिवसेना उबाठाचे सहसंपर्कप्रमुख राजू महाडीक, तालुकाप्रमुख बड्या साळवी, तालुकायुवाअधिकारी प्रसाद सावंत, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहप्रमुख बावा चव्हाण, माजी नगरसेवक नितीन तळेकर, सलील डाफळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी तालुक्यातून सिनेटच्या निवडणुकीसाठी तब्बल चारशे अर्ज भरण्यात आले होते तर जिल्ह्यातून एक हजार अर्ज भरले गेले होते. मतदार यादीत फक्त ७७ नावे आहेत. अनेक मतदारांची नावे रायगड व सिंधुदुर्ग केंद्रावर असल्याचेही पुढे आल्याचे तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी सांगितले. यात नक्कीच गोलमाल असून, भरलेल्या अर्जाचे झाले काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 25/Sep/2024