रत्नागिरी : जिल्ह्यात सात महिन्यात दीडशे महिलांची मुदतपूर्व प्रसूती

रत्नागिरी : गर्भावस्थेतील माता किंवा गर्भातील बाळाला धोका निर्माण झाल्यास अकाली प्रसूती करावी लागते. गेल्या सात महिन्यांत झालेल्या एकूण १ हजार ५४२ प्रसूतींपैकी १५० प्रसूती मुदतपूर्व प्रसूती असल्याची माहिती पुढे आली आहे.

अकाली किंवा लवकर जन्मामुळे नवजात बाळाच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. कारण, बाळाचा मेंदू, फुप्फुसे आणि यकृत यासारख्या अनेक अवयवांची पूर्ण वाढ गर्भधारणेच्या शेवटच्या आठवड्यात होते. काही वेळा मातेला रक्तदाब, हृदयविकार आदी गंभीर आजार उद्भवले किंवा काही वेळा रक्तस्राव वाढला अथवा गर्भजल कमी झाले, आदी कारणांमुळे माता आणि बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. अशावेळी डॉक्टर अकाली प्रसूतीचा निर्णय घेतात. ३७ आठवड्यांच्या आधी प्रसूती झाल्यास ती अकाली प्रसूती समजली जाते. २८ ते ३४ आठवड्यांत झालेली प्रसूती बाळासाठी धोकादायक असते. या कालावधीत बाळाची वाढ अपुरी असते. त्यामुळे त्याची पूर्ण वाढ होण्याच्यादृष्टीने नवजात अतिदक्षता विभागात (NICU) या बाळाला ठेवले जाते. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत एकूण १५४२ प्रसूती झाल्या. त्यापैकी १५० प्रसूती गंभीर कारणांमुळे मुदतीपूर्व कराव्या लागल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:37 30-11-2024