गुहागर : वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांनी आ. भास्कर जाधव यांच्यावर केलेले आरोप खोटे व त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करणारे होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार असलेल्या आ. जाधव यांचे नाव घेऊन बदनाम करुन मतदानावर कसा जाणीवपूर्वक परिणाम करता येईल, असे कृत्य घडविले गेले आहे. त्यांचा हा खोटारडेपणा जनतेसमोर जाहीरपणे उघड व्हावा, असे निवेदन गुहागर तालुका शिवसेना उबाठा गटाच्या वतीने मंगळवारी गुहागर पोलिस ठाण्यात देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकादरम्यान गुहागर तालुक्यामध्ये दि. 17 नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास ऊर्फ अण्णा जाधव यांच्यावर तालुक्यातील नरवण येथे प्राणघातक हल्ल्याची घटना घडली. ही घटना ही विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात घडून गुहागर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भास्कर जाधव यांनीच घडविल्याचे बिनबुडाचे आरोप फिर्यादी विकास ऊर्फ अण्णा जाधव यांनी जाहीरपणे सोशल मीडिया, इलेक्ट्रानिक मीडिया व सर्व प्रसार माध्यमांद्वारे पसरविले. यातून आ. जाधव यांचा वारंवार नामोल्लेख करून बदनामी केली. यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदानावर परिणाम होणारे हे कृत्य होते. त्यामुळे आपण या घटनेची तत्काळ दखल घेवून जनतेसमोर वेळीच सत्य काय ते आणणे आवश्यक होते. उशीरा का होईना आपण यातील आरोपींना नुकतेच पकडल्याचे वाचनात आले.
या प्रकरणी आणखी काहीजणांचा सहभाग असून त्यांनाही अटक करून सत्य जनतेसमोर गुहागर पोलिसांनी आणावे. अण्णा जाधव यांचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड व्हावा, अशी विनंती गुहागर तालुका शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदनातून केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 12-12-2024














