रत्नागिरी : जि. प. च्या १०४ शाळांमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’

रत्नागिरी : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांसह इतर बांधकामे आणि प्राथमिक शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या १०४ शाळांमध्ये हा प्रकल्प उभारला आहे. मात्र, अद्यापही २,२८५ शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आलेला नाही.

जिल्ह्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जिल्ह्यात पाण्याची पातळी खोल जाते. त्यामुळे जिल्ह्यात अनेक गावे, वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचते. पाणीटंचाईचे चटके मार्चपासून जाणवायला सुरवात होते. एक तर भूगर्भातील पाण्याचा उपसा हा जास्त प्रमाणात होतो. परंतु, त्याचे पुनर्भरण होत नाही. यामुळे जिल्ह्यात उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते, शिवाय टँकरने पाणी विकत घ्यावे लागते.
छतावरून पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे हा त्यावर उत्तम पर्याय आहे. मात्र, जिल्ह्यात त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. आजही जिल्ह्यात अनेक शासकीय कार्यालयांच्या इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारलेला नाही. पावसाचे पाणी साठविण्यासाठी शासकीय कार्यालये, शाळांच्या इमारतीवर हा प्रकल्प राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील १०४ शाळांच्या इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारले आहेत. मात्र, अजूनही २,२८५ शाळांनी या प्रकल्पासाठी कोणतीच हालचाल केलेल्या नाहीत. त्यामुळे हा प्रकल्प कागदावरच राहिला आहे.

प्रकल्प राबविणे कठीण
जिल्ह्यातील बहुतांश शाळांच्या इमारती जुन्या आहेत. काही शाळांच्या इमारतींची तातडीने दुरुस्ती आवश्यक आहे. त्याचबरोबर अनेक शाळा पटसंख्येअभावी बंदही होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांच्या इमारतींवर हा प्रकल्प राबविणे शक्य होणार नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:46 13-12-2024

Shanti real estate 1