राजापूर : प्रवासीसंख्या वाढल्याने एसटी महामंडळाच्या ‘लालपरीला’ अच्छे दिन येऊ लागले आहेत. प्रवाशांकडूनही एसटी चांगला प्रतिसाद मिळताना दररोज सुमारे १४ हजार किमी प्रवास होत असून सुमारे साडेचार लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.
एसटी महामंडळाकडून पुरेशा प्रमाणात चालक-वाहकांसह एसटी बस उपलब्ध करून दिली जात नसल्याने आगाराला प्रवाशांना सुरळीत प्रवासीसेवा देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काहीवेळी एसटी गाड्यांच्या नियमित फेऱ्यांचे नियोजनही विस्कळीत होत आहे.
राजापूर आगाराला दरदिवशी २६४ फेऱ्या माराव्या लागणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रत्येकी १३९ चालक आणि वाहक असे मिळून तब्बल २७८ चालक-वाहकांची आवश्यकता आहे; मात्र, सद्यःस्थितीमध्ये १५४ चालक-वाहक कार्यरत असून, तब्बल १२४ चालक-वाहक कमी आहेत. त्यातून, एसटी आगाराचे नियमित फेऱ्यांचे नियोजन विस्कळीत होताना १९४ नियमित फेऱ्या मारल्या जाताना तब्बल ७० फेऱ्या कमी मारल्या जात आहेत. खासगी गाड्यांचा सुळसुळाट असला तरी आजही ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळांची लालपरीच आपल्या हक्काची गाडी ठरत आहे. खासगी वाहतुकीशी स्पर्धा करताना एसटी महामंडळानेही प्रवाशी वाढवण्याच्यादृष्टीने विविध उपक्रम आणि प्रवासी योजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये महिलांना ५० टक्के तिकिटात सवलत, विद्यार्थी पाससह यासह अन्य सवलतीच्या प्रवासी योजना आदी उपक्रम राबवले जात आहेत. एसटी अच्छे दिन येताना तोट्यातील महामंडळ काहीसे फायद्यामध्ये येऊ लागले आहे. काळानुसार एसटीने आधुनिकता स्वीकारताना प्रवाशांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्यासाठी चालक-वाहकांसह गाड्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे; मात्र, त्याकडे काहीसे दुर्लक्ष होत असल्याने आगार प्रशासनाला स्थानिक पातळीवर प्रवाशांना गाड्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रवासी सेवा देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 14-12-2024














