चिपळूण : वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास (अण्णा) जाधव यांनी नरवण येथे झालेल्या हल्ल्या विरोधात गुढे फाटा- बहादूर शेख नाका ते चिपळूण उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयापर्यंत गुरुवारी मोर्चा काढला. या मोर्चाकडे स्थानिक समाजबांधवांनी पाठ फिरवल्याने फारसा प्रतिसाद लाभला नाही. परंतु या मोर्चाच्या आयोजनास उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी परवानगी नाकारली असताना जमाबंदी आदेशाचे उल्लंघन करून मोर्चा काढल्याने एकूण १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरवण येथे दि. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्यासंदर्भात ४ आरोपींना अटक करण्यात आली असून, अन्य आरोपींचा पोलिस पथक कसून शोध घेत आहेत. जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेश लागू केलेला असून अशा वेळी मोर्चाचे आयोजन केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने परवानगी उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी नाकारली होती. असे असताना विकास ऊर्फ अण्णा जाधव, गीता विकास जाधव, ड. सर्वजित बनसोडे, संतोष पवार) रा. झोंबडी, ता. गुहागर), नितीन जाधव, प्रतीक गमरे, सौ. सुषमा गमरे, सुनील जाधव, बबन गमरे यांच्यासह प्रमुख सुमारे १०० ते १५० कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. त्याबद्दल चिपळूण पोलिस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक तपासणी पोलिस करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 PM 14/Dec/2024














