रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी चौथ्यांदा घेतली मंत्रिपदाची शपथ

◼️ शपथविधी सोहळ्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात जल्लोष

रत्नागिरी : रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी सलग चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रत्नागिरीतील शिवसैनिकांचा उत्साह द्विगुणित झाला. नागपूरमध्ये शपथविधी झाल्यानंतर शिवसैनिकांनी मिठाई वाटून हा आनंदोत्सव साजरा केला.

मंत्रिपदाची शपथ घेतलेले रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी विधानसभेची 2004 ची पहिली निवडणूक जिंकल्यानंतर मागे वळून पाहिले नाही. यापूर्वी ते नगरविकास राज्यमंत्री, त्यानंतर म्हाडाचे सभापतीपद, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उद्योग मंत्रालयासह इतर अनेक खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे. ना. उदय सामंतांनी आपल्या राजकीय कार्यपद्धतीने एका राज्यस्तरीय नेत्याचा मान मिळवला असल्याने रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.

रविवारी संध्याकाळी त्यांनी नागपूर येथे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. कोणत्याही परिस्थितीत मंत्रीपद मिळण्याची खात्री असल्याने अनेक शिवसैनिक शपथविधी सोहळ्यासाठी नागपूर येथे गेले आहेत. उदय सामंतांना पुन्हा मंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात आनंद व्यक्त केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 16-12-2024