रत्नागिरी : कुर्धे गावातील धोकादायक लोखंडी साकव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

पावस : रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे गावातील नदीवरील लोखंडी साकव पावसाळ्यामध्ये धोकादायक बनला होता. या साकवाची अद्यापही स्थिती जैसे थे आहे. त्यामुळे या साकवाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

पावसाळ्यामध्ये होणारी ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी काही वर्षांपूर्वी कुर्धे नदीवर लोखंडी साकव बांधण्यात आला होता. त्यामुळे पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी यांना ये-जा करणे सोयीचे ठरले होते.

त्यामुळे संपूर्ण गावाचा संपर्क या साकवामुळे झालेला होता. पावसाळ्यापूर्वी हा लोखंडी साकव धोकादायक बनला होता. या संदर्भात तक्रार केल्यानंतर तातडीने शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली व परिस्थितीची पाहणी केली. साकवाची तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्यात आली. कारण नदीला पाणी असल्या कारणाने त्याची व्यवस्थितरीत्या दुरुस्ती करणे शक्य नव्हते.

पावसाळा गेल्यानंतर साकवाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, आजही हा साकव दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे प्रशासनाने संभाव्य धोका लक्षात घेत तातडीने या लोखंडी साकवाची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 16/Dec/2024