चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील आडिवरे गावचे सुपुत्र नटवर्य केशवराव दाते यांच्यातील तैलचित्राचे अनावरण शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयातील तैलचित्र दालनामध्ये त्यांचे पणतू अभिनेते क्षितिज दाते, नातू गिरीश दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
सुरुवातीला लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे यांनी नटवर्य केशवराव दाते यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. त्यांचं बालपण राजापूर तालुक्यातील आडिवरे येथे गेले. पुढे मुंबईत जाऊन त्यांनी नाट्यक्षेत्रात आपला प्रवास सुरू केला. सुरुवातीला महाराष्ट्र नाटक मंडळ व त्यानंतर मन्वंतर यामध्ये त्यांनी प्रथमच स्त्री भूमिका केली. त्या काळात स्वी भूमिका हे पुरुषच करत असत. त्या वेळी नाटकात काम करण्याला प्रतिष्ठा नव्हती. त्या काळात केशवराव दाते यांनी कलाकारांना प्रतिष्ठा मिळवून दिली. चित्रपटाचा प्रवास सुरू झाला. कुंकू, शेजारीसारखे चित्रपट, इरनक झनक पायल बाजे, नवरंगसारख्या हिंदी चित्रपटात त्यांनी आपल्या भूमिकेतून ठसा उमटवला, रंगभूमीवरील उत्कृष्ट अभिनयासाठी १९६४ ला संगीत नाटक अकादमीचे राष्ट्रपती पदक मिळवलेला असा हा आपल्या मातीतील अभिनेता होता, असे सांगताना त्यांच्या विषयीच्या अनेक आठवणी, किस्से प्रकाश देशपांडे यांनी सांगितले.
धर्मवीर चित्रपटात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणारे व केशवराव दाते यांचे पणतू क्षितिज दाते यांनी लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्या या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. कोकणातील जुन्या काळातील विविध क्षेत्रातील नामवंतांचे तैलचित्र व त्यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. असा उपक्रम सर्वच ठिकाणी व्हायला हवा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पणजोबांकडून आपल्याला कलेचा वारसा मिळाला. पुरुषोत्तम करंडकमध्ये पणजोबांच्या नावाने असणारा पुरस्कार मिळाला आणि मग अभिनय क्षेत्रात मागे वळून पाहिले नाही, असे त्यांनी सांगितले. लोकमान्य टिळक मालिकेतही अभ्यासपूर्ण भूमिका वठवण्याची संधी मिळाली, धर्मवीर चित्रपटात एकनाथ शिदि यांची भूमिका साकारण्याचे मोठं आव्हान आपल्यासमोर होते. याप्रसंगी गिरोश दाते व क्षितिज दाते यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन मनीषा दामले, आभार विनायक ओक यांनी मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 16/Dec/2024














