वाढीव घरपट्टीबाबत चिपळुणातील व्यापारी आक्रमक

चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेने नागरिकांवर अन्यायकारी वाढीव घरपट्टीचा बोजा टाकल्यामुळे नागरिकांत असंतोष पसरला आहे. त्यामुळे संतप्त एकता व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व नागरिक यांनी आज ता. १४ रोजी नगरपालिकेवर घडक दिली. मुख्याधिकारी विशाल भोसले व प्रशासकीय अधिकारी पेढांबकर यांना याबाबत शिरीष काटकर, अरुण भोजने, संदीप लवेकर, मनोज शिंदे आदींनी जाव विचारला. यावेळी झालेल्या सर्वेक्षणात झालेल्या अनेक चुका प्रशासनाच्या निदर्शनास आणल्या. यानंतर या चुका मान्य करून त्या सुधारण्यात येतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

रत्नागिरीसारख्या मोठ्या नगरपरिषदेने आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत सर्व्हे केला; मात्र चिपळूण नगरपालिकेने कोट्यवधी रुपये मोजून सुमारे वर्षभरापूर्वी परगावातील एजन्सीकडून शहरातील घर व इमारत दुकानांचा सर्व्हे केला. सर्व्हे करताना नागरिक अथवा नगरपालिकेला विश्वासात न घेता हा सर्व्हे करण्यात आला. मुळात तो सर्व्हेच चुकीच्या प्रकारे झाला आहे. त्याचमुळे आताच्या परपट्टी चुकीच्या पद्धतीने आलेल्या आहेत.

त्यामुळे पुन्हा सर्व्हे करावा, अशी मागणी होत आहे तसेच सद्यस्थितीत जुन्याच रकमेने आकारणी व्हावी, अशीही मागणी केली. सुमारे ७० वर्षांच्या जुन्या घरांना १९९५ साली बांधलेले दाखवलेले आहेत. त्यामुळे घरपट्टीत वाढ होण्यास भर पडली आहे. घराच्या बाजूला असलेल्या गाडी पार्किंग शेड, पावसाळी शेड, चुकीची मोजमापे अशा अनेक प्रकारच्या चुका सव्र्व्हे करताना झाल्या आहेत. सुमारे १८ हजार मालमत्ता धारकांना नोटीसा द्यायच्या आहेत. ३० दिवसांत म्हणजे २८ डिसेंबरपर्यंत नोटिसीवर हरकती घ्यावयाच्या आहेत; परंतु आतापर्यंत फक्त ४० टक्के लोकांनाच नोटिसा पोहोच झाल्या आहेत. नोटीसीवर हरकती कधी घ्यायच्या हा मोठाच पेच नागरिकांसमोर आहे.

यावेळी शिरीश काटकर, अरुण भोजने, संदीप लवेकर, मनोज शिंदे, राजेश पाथरे, स्वाती भोजने, जतीन आंबुर्ले, मंदार चिपळूणकर, शैलेश जागुष्टे यांच्यासह व्यह्यारी व नागरिक उपस्थित होते.

दि. १८ डिसेंबर रोजी बैठक
दि. २८ डिसेंबरपर्यंत हरकती नोंदवून घेतल्या जाणार आहेत. यानंतर त्यावर सुनावणी घेऊन घरपट्टी यादी अंतिम केली जाणार आहे. तसेच ज्यांच्या हरकती व शंका असतील त्यांनी नगरपरिषदेशी संपर्क करावा, असे मुख्याधिकारी यांनी चर्चेवेळी सांगितले. यासंदर्भात १८ डिसेंबर रोजी बन्याबापू चितळे सभागृह येथे संध्याकाळी ५ वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला नागरिकांनी उपस्थित राहावे तसेच ज्या नागरिकांना नोटीसा आल्या आहेत त्यांनी नगरपरिषदेमध्ये उपलब्ध असलेल्या फॉर्ममध्ये हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:19 16-12-2024