रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील गडनदी पात्राच्या करजुवे खाडीत सक्शन पंपाने वाळू उपसा सुरू आहे. तहसील आणि खनिकर्म विभागाला याबाबतची काही दिवसांपूर्वी माहिती मिळाली. शासन महसुलाचे नुकसान होत असताना आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असतानाही दोन्ही विभागांना अद्याप कारवाईसाठी उसंत मिळालेली नाही.
संगमेश्वर तालुक्यातील करजुवे तिसंग खाडीतून कोणतीही परवानगी न घेता वाळू उपसा केला जात असल्याची माहिती तहसील आणि खनिकर्म विभागाला मिळाली आहे; परंतु गेल्या दहा ते पंधरा दिवसांत याठिकाणी कारवाई करण्यासाठी वेळच मिळालेला नाही. त्यामुळे वाळू उपसा करणाऱ्यांचे धाडस आणखी वाढले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपासून हे सक्शन पंप सुरू झाले आहेत.
सक्शन पंपाने वाळू उपसा करता येत नाही. वाळू काढण्याचे लिलावही झालेले नाहीत. अशावेळी करजुवे तिसंग खाडीत सक्शन पंप लावून वाळू उपसा करण्याचे धाडस कोणाच्या आशीर्वादामुळे केले जातेय? शासनाच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी संबंधीत तहसील आणि खनिकर्म प्रशासनाला वेळच का मिळत नाही? असा संशयास्पद प्रश्नही निर्माण होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 20/Dec/2024














