जयगड येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करावे : राजेश सावंत

रत्नागिरी : जयगड येथे पाच कंपन्या असून, त्यांनी एकत्र येऊन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करावे. शिवाय रत्नागिरीत अन्य कंपन्याही आहेत, त्यांनीही आपापली रुग्णालये स्थानिक रहिवाशांसाठी उभारली पाहिजेत. काही दिवसांपूर्वी वायूगळती झाल्यानंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रामस्थ, मुलांना त्रास सहन करावा लागला, हे ताजे उदाहरण आहे. दोन वेळा वायूगळती झाल्यानंतर त्याची दखल प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घ्यायला हवी होती. दरम्यान, खासदार नारायण राणे यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून, अधिवेशन संपल्यानंतर ते रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत, असे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजप जिल्हा संपर्क कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली.

वायू गळतीमुळे त्याच दिवशी नव्हे तर अद्यापही रुग्ण दाखल होत आहेत, त्यामुळे लोकांसाठी आम्ही कायम उपलब्ध आहोत, असे सावंत म्हणाले. वायू गळतीनंतर झालेल्या बैठकीला भाजप व अन्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावले नव्हते. मात्र भाजपसह सर्व पक्षीयांना जिल्हा प्रशासनाने बोलावले पाहिजे. कारण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांना फोन येत असतात. वायू गळतीच्या दिवशी सर्वपक्षीय लोक, सामाजिक संस्था माणुसकीच्या नात्याने मदत करत होते.

इएसआयसी’ची माहिती द्यावी
पूर्वी कंपन्यांतील कामगारांसाठी ईएसआयसी लागू होते. त्यामुळे कामगारांना कंपनीत जिवाला धोका झाल्यास विमा उतरवला जात होता. त्याचा लाभ किती कामगारांना मिळाला आहे, याची माहिती कामगार अधिकाऱ्यांनी जनतेसाठी जाहीर करावी. शिवाय या योजनेची अंमलबजावणी होत आहे की नाही, याचीही माहिती द्यावी, असेही सावंत म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 20/Dec/2024