चिपळुणात नागरिकांनी वाचला वाढीव घरपट्टी विरोधात तक्रारींचा पाढा

चिपळूण : शहरातील मालमत्ताधारक नागरिकांच्या घरपट्टी करात झालेल्या वाढीव रकमेबाबत तक्रारीच्या माध्यमातून हरकत घेण्यासाठी चिपळूण नगर परिषदेने कालपासून सुनावणी सुरू केली. यासाठी शहरातील नागरिकांनी गुरुवारी सकाळपासूनच सांस्कृतिक केंद्रात मोठी गर्दी केली होती. हरकत घेणाऱ्यांमध्ये तरुणांपासून वृद्धांचा मोठ्या प्रमाणात समावेश असून, ही सुनावणी पुढे चार दिवस चालणार आहे.

दरम्यान, २८ डिसेंबरपर्यंत हरकत व तक्रार स्वीकारण्याची शेवटची मुदत आहे. मात्र, पहिल्याच दिवशी पहिल्या टप्प्याच्या सुनावणीत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. चतुर्थ वार्षिक श्रेणी आकारणीनुसार न.प. प्रशासनाकडून यावर्षी शहरातील रहिवास व व्यावसायिक मालमत्ता धारकांच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. प्रामुख्याने चार वर्षांनी होणारे सर्वेक्षण गेल्या काही वर्षांत न झाल्याने यावर्षी झालेल्या सर्वेक्षणात मालमत्ता धारकांच्या कर रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. प्रामुख्याने सदोष आणि चुकीच्या पद्धतीने झालेल्या सर्वेक्षणामुळे मालमत्ता करात अवास्तव वाढ झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सुरू झाल्या आहेत. या तक्रारींची सुनावणी गुरुवारपासून सांस्कृतिक केंद्रात सुरू झाली. सकाळच्या पहिल्या टप्प्यात हरकती व तक्रारी नोंदविण्यास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नगररचना विभागातून आलेल्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या तीन दालनात नागरिकांच्या हरकती व तक्रारी नोंदविण्याचे काम सुरू केले. त्यानुसार संबंधित नागरिकांनी पूर्वीची घरपट्टी रक्कम, वाढीव आलेली रक्कम, त्याबाबत असलेली हरकत व तक्रार तसेच आक्षेप यांची नोंद योग्य पुराव्यासह करून घेण्याचे काम सुरू होते. त्यानुसार अधिकाऱ्यांकडून तक्रारदार नागरिकांकडून दिलेली माहिती व पुरावे यांची पडताळणी करून संबंधित नागरिकांकडून नियोजित अर्जावर स्वाक्षरी घेतली गेली व संबंधितांच्या तक्रारीचे पुन्हा सर्वेक्षण केले जाईल, असे सांगितले जात होते.

ज्येष्ठ नागरिकांवर हेलपाटे मारण्याची वेळ…
सदोष आणि चुकीच्या पद्धतीने केलेल्या सर्वेक्षणामुळे शहरातील हजारो नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागल्याचे दिसून आले. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक व वृद्ध मालमत्ता धारकांची संख्या मोठी होती. चुकीच्या नोंदीमुळे चाळीस वर्षापूर्वी बांधलेल्या घराचे मालक आजच्या घडीला वयाच्या ८०व्या वर्षात पोहोचले असताना खासगी कंपनीने केलेल्या चुकीच्या कामामुळे त्यांनाही नगर परिषदेत हेलपाटे मारण्याची वेळ आली. दुसऱ्या बाजूला न.प. च्या विविध प्रशासन विभागात अधिकारी म्हणून काम केलेल्या निवृत्त झालेल्या विभागप्रमुख, कर्मचाऱ्यांना देखील सदोष सर्वेक्षण व आकारणीचा फटका बसल्याने त्यांना हरकती नोंदविण्याची वेळ आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:16 PM 27/Dec/2024