रत्नागिरी : जिंदल पोर्ट कंपनीच्या आवारातून झालेल्या वायूगळतीचे गूढ अजून कायम आहे. चौकशी समितीचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असून, चार दिवसांमध्ये अहवाल सादर केला जाणार आहे. केमिकल अभियंत्याकडून झालेल्या पाहणीमध्ये इथिनॉल मरकॅप्टन वायू हवेतून पसरताना विरळ होत जातो. त्यामुळे २.३ किमी एवढ्या अंतरापर्यंत त्याचा प्रभाव राहू शकतो का? एलपीजी पार्किंग प्लॉट किंवा शाळेच्या प्रयोगशाळेत काही झाले होते का? याची चौकशी सुरू आहे
जिंदल पोर्ट कंपनी परिसरामध्ये झालेल्या वायूगळतीमुळे सुमारे ९० मुलांना बाधा झाली. त्यांना श्वसनाचा, उलटी, पोटदुखी, डोकेदुखीचा त्रास झाला. या घटनेने औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आदेशानंतर कंपनीच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला तसेच तत्काळ अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. गेली पंधरा दिवस या वायूगळतीची चौकशी सुरू आहे; परंतु अजूनही वायूगळती कुठून झाली, याचे गूढ कायम आहे. शालेय समितीने देखील याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी अनेक मागण्या चौकशी समितीपुढे ठेवल्या आहेत. ज्या दिवशी वायूगळतीचा हा प्रकार घडला त्या दिवशीचे कंपनी, पार्किंग आणि शाळेतील सीसीटीव्ही फूटेज मागवण्यात आली आहेत.
केमिकल अभियंत्यांनी नुकतीच याची सखोल चौकशी केली. या चौकशीमध्ये इथिनॉल मरकॅप्टन हा वायू हवेत पसरल्यानंतर पुढे जानाता विरळ होत जातो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यानुसार कंपनी आणि शाळेतील अंतर २.३ किमी आहे. त्यामुळे एवढ्या लांब त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता कमी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुसरी बाजू म्हणजे शाळेच्या जवळ जे एलपीजीचे टँकर पार्किंग आहे तेथून काही वायूगळती झाली आहे का? याची चौकशीही केली जात आहे. ही घटना दुपारी साडेबारा वाजता घडली आहे. एलपीजीला उष्णता लागेल तसा वर जातो तेव्हा प्रचंड उष्णता होते त्यामुळे तेथे काय झाले आहे का? याची तपासणी केली जात आहे. शाळेतदेखील केमिकल इंजिनिअर यांनी चौकशी केली. प्रयोगशाळेत काही प्रयोग तेव्हा झाला होता का? याचीही चौकशी सुरू आहे. चौकशी समितीची चौकशी अंतिम टप्प्यात असून, चार दिवसांत अहवाल सादर होणार आहे.
“जिंदल पोर्ट कंपनीतील वायुगळतीच्या चौकशीला पंधरा दिवस झाले आहेत. सर्व अंगाने बारकाईने ही चौकशी केली जात आहे. आता चौकशी अंतिम टप्प्यात असून, चार दिवसांमध्ये चौकशी समितीचा अहवाल सादर केला जाणार आहे.” – जीवन देसाई, प्रांताधिकारी तथा चौकशी समिती समन्वयक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 28-12-2024













