रत्नागिरी : जोडून आलेल्या सुट्यांमुळे गेले आठवडाभर गणपतीपुळेत पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे. यंदाच्या वर्षातील गर्दीच्या उच्चांक मोडणारा शनिवार (ता. २८) ठरला. रविवारही दिवसभर गर्दी होती. दोन दिवसात सरासरी २५ हजारहून अधिक पर्यटकांनी गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेतले. चारचाकीसह खासगी वाहने घेऊन येणाऱ्यांची गर्दी अधिक असल्यामुळे सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. अनेक पर्यटकांनी मोकळी जागा मिळेल तिथे निवास केला होता.
दरवर्षी नाताळ सुटीसह नववर्ष स्वागताला येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. त्याप्रमाणे यंदा २१ डिसेंबरपासून पर्यटक येण्यास सुरुवात झाली. दिवाळीच्या सुटीत विधानसभा निवडणूक असल्यामुळे पर्यटकांचा राबता कमी होता. त्यामुळे यंदा नाताळ सुट्टीत गर्दी वाढली. त्यामध्ये २८ आणि २९ जोडून शासकीय सुटी असल्यामुळे गणपतीपुळेत प्रचंड गर्दी होती. मोठ्याप्रमाणात आलेल्या पर्यटकांची राहण्यासाठीचीही व्यवस्था अपुरी पडली होती. काल एक रात्र तर अनेकांना मंदिरे, शाळांचे व्हरांडे यासह मोकळ्या जागांचा आसरा घ्यावा लागला. काही स्थानिक लोकांनी आपल्या घरीच व्यवस्था केली होती. बहुसंख्य पर्यटक खासगी वाहने घेऊन आल्यामुळे वाहतूक कोडीला सामोरे जावे लागत होते. गणपतीपुळे मंदिराकडेच नव्हे, तर मालगुंडकडे जाणारा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहन चालक एक एक तास अडकून पडत होते. त्यामधून मार्ग काढून पुढे सरकत जाणे म्हणजे द्राविडी प्राणायामच ठरत होता. गणपतीपुळे विकास आराखड्यात रस्ते नव्याने बनविण्यासाठीचा प्रस्ताव तयार करणयात आला होता. मात्र त्यावर योग्य ती कार्यवाही झालेली नाही. त्याचा फटका अजूनही पर्यटकांना बसत आहे. मंदिरात जाणाऱ्या मार्गावरह अनेकांनी वाहने उभी केलेली होती. वाहने पार्किंगसाठी जिथे जागा निश्चित केलेल्या होत्या, तिथेही जागा फुल होत्या. त्यामुळे भविष्यात वाहन पार्किंगचा प्रश्न सोडविण्याचे आव्हानच राहणार आहे. सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय करताना पोलिसांना कसरत करावी लागत होती.
काही पर्यटक माघारी फिरले
गणपतीपुळेकडे जाणाऱ्या मार्गावरही शिरगावपासून पुढे रस्ता अरुंदच असल्यामुळे वाहन चालकांना मोठा फटका बसला होता. सायंकाळच्या सुमारास या रस्त्यावर प्रचंड गर्दी होते. काही परजिल्ह्यातून आलेल्या वाहनचालकांनी वाहने मागे फिरवून रत्नागिरी शहरातून निवळीमार्गे गणपतीपुळेला जाणे पसंत केले.
यंदा वर्षभरातील सर्वाधिक गर्दीचा शनिवार ठरला. यापूर्वी एवढी गर्दी पाहायला मिळालेली नव्हती. रविवारी गर्दी कमी झाली. पुढील आठवडा पर्यटकांचा राबता राहील. – कल्पेश सुर्वे, हॉटेल व्यावसायिक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 30/Dec/2024














