रत्नागिरी : नववर्ष स्वागतासाठी प्रशासन सज्ज

रत्नागिरी : गोव्यासह बेळगाव समुद्रात बोटिंग करताना तर रायगडमध्ये पोहणाऱ्या पर्यटकांना जीव गमवावा लागल्याचे प्रकार मागील आठवड्यात घडले आहेत, त्यातच नववर्ष स्वागतासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे. त्यांच्या आनंदाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून पर्यटकाच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनासह पोलिसांनी समुद्र किनाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. किनाऱ्यावर गस्त, धोकादायक ठिकाणी पर्यटकांना माहिती देणारे फलक, पोहण्यास मनाई करणाऱ्या ठिकाणी ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देणे यासह मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

नववर्षानिमित्त पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलिस दलाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबरला गुहागर, हर्णे, मुरूड, केळशी (ता. दापोली), राजापूर तालुक्यात कशेळी पाईंट, रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे, आरे वारे, गावखडी, रत्नागिरी शहराजवळील भाट्ये, झरीविनायक, मांडवी यासह अन्य विविध प्रसिद्ध किनारी भागात पर्यटकांची गर्दी होत आहे. आनंदोत्सव साजरा करत असताना अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पोलिस पुढील दोन दिवस रात्रदिवस गस्त घालणार आहेत. आरे-वारे येथील खाडीच्या ठिकाणी भरतीवेळी पोहायला जाणे धोकादायक असल्यामुळे तशी सूचना देणारा फलक लावण्यात आला आहे. गणपतीपुळेमध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. समुद्रात पोहण्यासाठी जाणाऱ्यांना माईकद्वारे सूचनाही दिल्या जाणार आहेत. मद्यपान करून वाहन चालवताना अपघाताची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ठिकठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत. जेणेकरून बेतालपणे वाहने हाकणाऱ्यांना आळा बसू शकतो. तसेच तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक नागरिकांसह सागररक्षक, मच्छीमार बांधव यांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे.

नववर्ष स्वागताचा जल्लोष करताना प्रत्येकाने काळजी घ्यावी. वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. वाहतूक कोंडी होणार नाही. याकडे लक्ष द्यावे. मद्यपान करून वाहन चालवू नये. प्रत्येकाने सुरक्षिततेची काळजी घ्यावी. – धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 30/Dec/2024