गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेले गणपतीपुळे सन २०२४ या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि सन २०२५ या नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर गणपतीपुळेत विविध ठिकाणाहून लाखो पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण गणपतीपुळे परिसर आणि गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलून गेला आहे. स्वयंभू गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्याने संपूर्ण परिसरात असलेली वाहन पार्किंगची जागा अपुरी पडू लागली असून थेट नजीकच्या मालगुंड येथील खारभूमी मैदानात पार्किंग व्यवस्था गणपतीपुळे ग्रामपंचायतकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
या तीर्थक्षेत्रात विविध ठिकाणांहून आलेल्या पर्यटकांबरोबर सध्या शालेय मुलांच्या सहलींचे प्रमाण अजूनही मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. या तीर्थक्षेत्रात स्वयंभू श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची व पर्यटकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन संस्थान श्री देव गणपतीपुळेच्यावतीने दर्शनाची व्यवस्था अतिशय चोख करण्यात आली आहे. दर्शन रांगांच्या ठिकाणी मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच ग्रामपंचायतीकडून संपूर्ण गणपतीपुळे परिसर व मंदिर परिसरात विद्युत व्यवस्था आणि ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटक व भाविकांसाठी ठिकठिकाणी सूचनाफलक लावण्यात आले असून मोठ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जयगड पोलीस ठाण्याच्यावतीने रत्नागिरी पोलीस यंत्रणेमार्फत जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पार्किग व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी रत्नागिरी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी यांचबरोबर होमगार्ड व गणपतीपुळे ग्रामपंचायतचे सुरक्षा रक्षक अधिक मेहनत घेताना दिसून येत आहेत.
गणपतीपुळेत श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. याचबरोबर येथील समुद्रकिनारा देखील पर्यटकांच्या गर्दने भरून गेला आहे. सन २०२४ च्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि सन २०२५ च्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गणपतीपुळे येथील स्थानिक व्यावसायिकांबरोबर पर्यटक व भाविक आतूर झाले आहेत.
एकूणच शनिवार व रविवार जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे गणपतीपुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे तीस आणि ३१ डिसेंबर रोजी थर्टी फर्स्टच्या निमिताने पर्यटक अधिक संख्येने या ठिकाणी येऊन आनंद लुटतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या उंट, मनोरंजनासाठी घोडा सफर, ए टीव्ही बाईक राईड आदींचा समावेश आहे. पर्यटक या सर्वांचा आणि समुद्रातील खास आकर्षण असलेल्या टर स्पोर्टचा आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे.
पर्यटकांकडून विविध वस्तूंची खरेदी
या तीर्थक्षेत्रात असलेल्या स्थानिक व्यावसायिक बाजारपेठेबरोबरच या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकास यंत्रणेच्या आणि उमेदच्या माध्यमातून विभागीय व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याने त्या ठिकाणी असलेल्या महिला बचत गटांच्या उत्पादनांना व विविध प्रकारच्या वस्तूंना पर्यटकांची मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळे येथे आलेले पर्यटक वेगवेगळ्या वस्तूंचा व उत्पादन खरेदीचा देखील आनंद घेताना दिसून येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:35 PM 30/Dec/2024














