रत्नागिरी : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात प्रोत्साहनपर अनुदानातून जिल्ह्यात शौचालये, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी सुमारे पावणेसहा कोटी अनुदानाची मागणी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने शासनाकडे केली आहे. सहा महिने उलटले तरीही शासनाकडून ते अनुदान अद्याप आलेले नाही, एकीकडे लाडकी बहीण योजनेचे अनुदान वेळेवर सर्वत्र पोहोचत असताना हा निधी मात्र सहा महिने रखडला आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून १२ हजार रुपये देण्यात येतात. तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी ३ लाख रुपये अनुदान देण्यात येत असून, त्यामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २ लाख १० हजार रुपये, तर महात्मा गांधी स्वयंरोजगार योजनेतर्गत ९० हजार रुपये अनुदानाचा समावेश नाहे. हे अनुदान टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांना देण्यात येते. तसेच या प्रोत्साहनपर अनुदानात वेळोवेळी शासनाकडून वाढ केलेली आहे. जिल्ह्यात ३ लाख ३० हजार १६३ कुटुंबीय आहेत. त्यापैकी २ लाख २१ हजार ९१८ कुटुंषीयांकडे शौचालये बांधण्यात आलेली आहेत. तसेच जिल्ह्यात ७ हजार ८७० सार्वजनिक शौयालयांचा वापर करणात येतो. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात हजारो शौचालये उभारण्यात आली. तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी शोषखड्यांची खोदाई केलेली आहे. दारिद्रयरेषेखालील कुटुंबीयांनी शासनाकडून अनुदान मिळणार या आशेने ही शौचालयांची बांधकामे केली आहेत. मात्र, शासनाने अद्यापही या लाभार्थ्यांसाठी अनुदान दिलेले नाही. जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने शासनाकडे सहा महिन्यांपूर्वी पावणेसहा कोटीच्या अनुदानाची मागणी केली होती. हे अनुदान वेळेवर यावे यासाठी या कक्षाकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, अद्याप हे अनुदान आलेले नाही.
बांधकामासाठी प्रोत्साहनपर अनुदान
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेखालील तसेच दारिद्रयरेषेवरील आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते, मात्र या गरजू लोकांचे अनुदान येणे बाकी आहे. तसेच ग्रामीण भागात सार्वजनिक स्वच्छतागृह, सार्वजनिक बांधकाम तसेच सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन यासाठीही ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:28 PM 30/Dec/2024














