Ratnagiri : जिल्हास्तरीय मिनी सरस व विक्री प्रदर्शनात दोन दिवसांत २५ लाखाहून अधिकची विक्री

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या मिनी सरस व विक्री प्रदर्शनामध्ये दोन दिवसांत २५ लाख ६१ हजार रुपयांची विक्री झाली आहे.

हे जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन हे ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील स्वरोजगारिणी, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादित मालाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मानले जाते. यामध्ये बचतगटांनी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू (बुरूडकाम, गोधडी, लोकरीच्या विणकाम केलेल्या वस्तू, क्रेयॉनच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी इत्यादी) विविध प्रकारचे घरगुती मसाले (मच्छी मसाले, मटण मसाले), पिठे, पापड (नाचणी, उडीद, लसूण, सोयाबीन, पालक, बीट, टोमॅटो, पोह्याचे, ओव्याचे इत्यादी) लोणची (आंबा, लिंबू, मिरची, आवळा, करवंद इत्यादी) कोकम, आगळ इत्यादी, कोकणी मेवा (काजूगर, काजू मोदक, आंबावडी, आमरस, आंबापोळी आवळा मावा, फणसपोळी, करवंद वडी, तळलेले गरे इत्यादी), विविध फळांची सरबते (जांभूळ सिरप, आंबा सिरप, काजू सिरप, आवळा सिरप इत्यादी) रस, कोकणी खाद्यपदार्थ (मोदक, आंबोळी, थालीपीठ, पुरणपोळी, घावने, नारळवडी, जेवण, नर्सरी (आंबा कलमे, काजू कलमे, नारळ कलमे, चिकू कलमे, कोकम कलमे, विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे. बोन्साय इत्यादी) मध माफक दरात ग्राहकांना उपलब्ध आहेत.

गेल्या २८ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या प्रदर्शनास पर्यटकांनी तसेच ग्राहकांनी मोठ्या संख्येने भेट दिली आहे. दोन दिवसांतच २५ लाख ६१ हजार रुपयांची विक्री झाली आहे.

प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, तालुका विस्तार अधिकारी गोपाळ चौधरी, जिल्हा अभियान व्यवस्थापक अय्याज पिरजादे, जिल्हा विपनण व्यवस्थापक अमोल काटकर, जिल्हा व्यवस्थापक माहिती संकलन नयना बोरकर आदींनी सोमवारी भेट देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा सांगता समारंभ १ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 31-12-2024