रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात अद्ययावत कम्युनिटी सेंटर विकसित करण्याबाबतची पूर्वतयारी झाली आहे. परंतु, त्या कामाच्या ठिकाणी असलेली किंवा राजाकालीन बुद्धविहारातील बुद्धाची मूर्ती हलवून सुरक्षितस्थळी ठेवण्याबाबत मतभेद आहेत. त्यामुळे कार्यारंभ आदेश असतानाही काम सुरू करता येत नाही. त्यामुळे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनाच सुवर्णमध्य काढावा लागणार आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तर महाअभियानांतर्गत येथील अद्ययावत कम्युनिटी सेंटरच्या कामाला कोटयवधीचा निधी उपलब्ध करून दिला. येथील बुद्धविहार आणि कम्युनिटी सेंटर पर्यटकांचे आकर्षण ठरेल, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले. विधानसभा निवडणुकीपूर्वीच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भूमिपूजन केले. या दरम्यान काम सुरू करण्याबाबत विकासकाला कार्यारंभ आदेश रत्नागिरी नगरपरिषदेकडून देण्यात आला. परंतु, आचारसंहिता असल्याने प्रत्यक्ष निवडणुका पार पडल्यानंतर हे काम सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या या पार्श्वभूमीवर येथील बुद्धविहाराच्या ठिकाणी असलेली बुद्धाची मूर्ती सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवल्यानंतरच काम सुरू करण्याचे नियोजन झाले. त्यानुसार ती मूर्ती हलविण्याबाबत चर्चा करण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेने प्रमुख मंडळीना निमंत्रित केले. मूर्ती स्थलांतरीत करताना किंवा केल्यानंतर जनसमुदायामाने गैरसमज पसरू नयेत, यासाठी गेल्या मंगळवारी बैठकीचे नियोजन केले होते. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या चर्चेवेळी मूर्ती स्थलांतरीत करण्याबाबत मतभेद दिसून आले. त्यामुळे कम्यूनिटी सेंटर विकसित करण्याचे काम कधी सुरू करायचे याबाबत निश्चितता होऊ शकलेली नाही, त्यामुळे हे मतभेद शांत करण्यासाठी रत्नागिरीचे आमदार तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 31/Dec/2024














