वानर, माकड यांना पशू घोषित करावे : अविनाश काळे

रत्नागिरी : कोकणातील शेतकऱ्यांना वानर, माकडांकडून प्रचंड त्रास होत आहे. याच्या बंदोबस्तासाठी उपोषण केले. मात्र, ठोस उपाय योजले गेले नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वानर, माकड यांना उपद्रवी पशू घोषित करावे तसेच शेतीमध्ये आलेले वानर, माकड मारण्याची परवानगी द्यावी, शेतीसंरक्षण बंदुका परवाने शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी शेतकरी अविनाश काळे यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदन दिले. याबाबत लक्ष घालतो, असे आश्वासन खासदार राणे यांनी दिले.

खासदार नारायण राणे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना वानर, माकडांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल काळे यांनी माहिती दिली. याबाबत ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून वानर, माकड यांच्या उपद्रवाबाबत लाक्षणिक उपोषण, आमरण उपोषण केले. गोळप ते रत्नागिरी पदयात्रा काढली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह विविध पक्षाच्या नेत्यांकडे पत्रव्यवहार केला. आत्महत्येची परवानगी द्या, असे पत्रही दिले होते. या आंदोलनाकरिता रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये शेतकऱ्यांनी मला सहकार्य केले.

विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत आणि लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्यामुळे या प्रश्नावर तात्पुरता उपाय म्हणून वानर, माकडे यांना पकडून अभयारण्यात सोडण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे; मात्र वानर, माकड यांची संख्या प्रचंड आहे. त्यांची बेसुमार वाढ यामुळे त्यांचा कायमचा बंदोबस्त हा या प्रश्नावर उपाय आहे. हिमाचल प्रदेशप्रमाणे केंद्र सरकारने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत माकडांना उपद्रवी घोषित करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करत आहे. कोकण समृद्ध होण्यासाठी आणि कोकणातील शेती आणि शेतकरी वाचवण्यासाठी याशिवाय पर्याय नाही, असे काळे यांनी सांगितले.

वानर, माकडांच्या त्रासाने शेतकरी, बागायतदार कंटाळले आहेत. या बाबतीत मी जमेल तसा पाठपुरावा करणार आहे. वेळप्रसंगी दिल्लीमध्ये जाऊन आंदोलन करणार आहे. सगळ्यांच्या मदतीची, सहकार्याची अपेक्षा आहे. अविनाश काळे, गोळप

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 31/Dec/2024