रत्नागिरी : मंत्री उदय सामंत रमले क्रिकेट खेळण्यात

रत्नागिरी : उद्योग आणि मराठा भाषा मंत्री उदय सांमत हे उत्तम क्रिकेटपटू आहेत. रत्नागिरी दौऱ्यावर असताना तालुक्यातील कोळंबे येथे काही मुलं क्रिकेट खेळत होती. तेव्हा सामंत यांनी सर्व राजशिष्टाचार बाजूला ठेवून धावपळीच्या आयुष्यातून काहीसा वेळ काढला आणि कोळंबे येथे भाजीमळ्यात मुलांबरोबर क्रिकेट खेळण्यात रमले.

रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे गावच्या दौऱ्यावर परवा सामंत होते. गावात जात असताना तेथील भाजीमळ्यामध्ये काही मुलं क्रिकेट खेळताना दिसली. सामंत हे एक उत्तम खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांची जिज्ञासा जागी झाली. त्यांनी तत्काळ ताफ्यातील आपली गाडी थांबवली, सर्व राज्यशिष्टाचार बाजूला ठेवून ते गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळायला त्या मैदानात उतरले. गावातील खेळाडूंसोबत मैदानावर उतरून त्यांनी फलंदाजी केली. त्यांनी आपल्या फलंदाजीतील कौशल्य मुलांना दाखवून दिले. त्यांच्या फलंदाजीचा अंदाज पाहून मुलांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मंत्री आपल्याबरोबर खेळतात, याचा विलक्षण आनंद मुलांमध्ये होता.

खेळून झाल्यानंतर त्यांनी मुलांशी संवाद साधून खेळाचे महत्त्व काय याबाबत चर्चा केली. त्यांनी मुलांना नियमित खेळण्यासाठी आणि त्यामधून आत्मविश्वास व संघभावना विकसित करण्यासाठी प्रोत्साहित केले. खेळामुळे केवळ शरीरस्वास्थ्यच नाही, तर मानसिक आरोग्यही चांगले राहते, असेही त्यांनी नमूद केले. मुलांनी त्यांच्या या सहभागाचे कौतुक केले व भविष्यातील खेळाडूंना असेच प्रोत्साहन मिळावे, अशी इच्छा व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 31/Dec/2024