दापोली : ‘बेस्ट टुरिझम व्हिलेज’ अॅवॉर्डमुळे दापोलीतील कर्दे गावचे पर्यटन वाढत असून, या ठिकाणची पांढरी वाळू पर्यटनाचे खास वैशिष्ट्य आहे. या पर्यटनाबरोबर येथील नैसर्गिक जैवविविधतेचेदेखील या गावाने जतन केले आहे. कर्दे या गावाला नुकताच केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून हा पुरस्कार मिळाला आहे. या स्पर्धेत 30 राज्ये सहभागी झाली होती. त्यामध्ये केंद्रशासित प्रदेशांमधील 991 गावांपैकी आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 36 गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली होती.
स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणार्या कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नांसाठी कर्दे गावाला हा बहुमान मिळाला. या स्पर्धेत कर्दे गावाने राज्याचे आणि कोकणचे प्रतिनिधित्व केले. कर्दे गावामुळे दापोली, रत्नागिरी आणि राज्य, देश पातळीवर पोहोचले. समुद्रकिनारी वसलेले कर्दे हे गाव पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.
स्वच्छ समुद्रकिनारा, कर्दे गावातील पर्यटन उद्योग, कृषी पर्यटन, आर्थिक सक्षमीकरण, महिलांचे सबलीकरण, जैवविविधता, उद्योग,दळणवळण, नैसर्गिक स्त्रोत वापरून केलेले जलव्यवस्थापन, परिसरातील सांस्कृतिक वातावरण, पर्यटन उद्योग आधारित रोजगार, सामाजिक जीवन आदींचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. त्यामुळे पर्यटक येथील ग्रामीण जीवनशैली बघण्यासाठी आवर्जून येतात. वर्षाकाठी जवळपास 2 लाख पर्यटक या गावाला भेट देतात. ग्रामीण जीवन शैली जपत असलेल्या या गावात पशुपक्षी, गाई -गुरे हे सुद्धा पर्यटकांना पाहता येतात. इथे 40 पर्यटन व्यावसायिक पर्यटन व्यवसाय करतात. पर्यटनाबरोबर जपलेली ग्रामीण जीवनशैली यामुळे हे गाव देशाच्या पटलावर आले आहे.
दापोलीचे पर्यटन वाढले पाहिजे तसेच या ठिकाणची जैवविविधताही टिकली पाहिजे तरच खर्या अर्थाने येथील पर्यटन व्यवसाय वाढेल. वर्षाचे बाराही महिने पर्यटन वाढण्यासाठी शासनानेही लक्ष देणे गरजेचे आहे. पर्यटन वाढावे म्हणून आम्ही सत्याने प्रयत्न करत आहोत. – सचिन तोडणकर, सरपंच कर्दे, दापोली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 31-12-2024













