महिन्यातील एक दिवस सायकलचा वापर करा : मुख्याधिकारी विशाल भोसले

चिपळूण : प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला प्रदूषणमुक्त शहरासाठी शहरातील जनतेने कामकाजासाठी पायी अथवा सायकलने बाहेर पडावे. वाहनांपासून होणारे प्रदूषण टाळावे अशा आवाहनासाठी सोमवार (दि. ३०) चिपळूण नगर परिषदेने शहरातील राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतीक क्षेत्रातील विविध संस्थांची बैठक घेतली. यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वाहनांचा प्रवास टाळून सायकल अथवा चालत घराबाहेर पडावे असे आवाहन केले.

शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आता प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला प्रदूषणमुक्त शहर करण्यासाठी एक दिवस का होईना वाहनाचा वापर करणे टाळावे यासाठी एक दिवस चालत अथवा सायकलचा वापर करा असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार चिपळूण नगर परिषदेतर्फेदेखील प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सर्व नागरिकांनी आपापले दैनंदिन कामकाज चालत
अथवा सायकलने करावे. एक दिवसासाठी वाहन वापरू नये. त्यातून प्रदूषणमुक्त शहर होण्यास हातभार लागेल. प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने व प्रक्षण टाळण्यासाठी या उपक्रमांत स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे व किमान महिन्यातील एक दिवस अर्थात महिन्याच्या एक तारखेला या संकल्पनेची अंमलबजावणी करावी असे आवाहन मुख्याधिकारी भोसले यांनी बैठकीत केले. यावेळी नवीन वर्षापासूनच म्हणजे १ जानेवारीपासून हा उपक्रम कायमस्वरूपी पुढे सुरू राहावा, असे नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, चिपळूण परिमंडल भाजपचे अध्यक्ष राम शिंदे, नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक मंगेश पेढांबकर, उद्यान विभागप्रमुख बापू साडविलकर, दिगंबर सुर्वे, खालिद दाभोळकर, कैसर देसाई, दिलीप आंब्रे, अदिती देशपांडे, समीर कोवळे आदीसह विविध सामाजिक, क्रीडा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 31/Dec/2024