साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथील चित्रकार विष्णू परीट यांच्या व्यक्ती चित्रांची आणि निसर्गचित्रांची कर्नाटक राज्य चित्रकला परिषदेच्या प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.

प्रदर्शनासाठी देश-विदेशातून सुमारे १५०० कलाकार सहभागी होणार आहेत. मुलींचे चेहरे या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन असणार आहे. बंगलोर येथील परिषदेच्या आवारात तसेच कुमार कृपा मार्गावर हे प्रदर्शन रविवारी आयोजित करण्यात येणार आहे. परीट हे आपली १०० चित्रे या प्रदर्शनात मांडणार असून, त्यात मुलींची व्यक्तिचित्रे, तर असणार आहेतच; पण त्याशिवाय निसर्गचित्रांचाही समावेश असणार आहे.

जलरंगात आणि पेन्सिल शेडिंगमध्ये ही सर्व चित्रे त्यांनी साकारली आहेत. ते ३५ वर्षे कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या ते साखरपा येथील कबनूरकर स्कूलच्या गुरुकुल विभागात चित्रकला प्रशिक्षक आहेत. त्यांची या आधी मुंबई, कोल्हापूर, पुणे, सांगली, कणकवली, नाशिक येथे चित्र प्रदर्शन झाली आहेत, तसेच त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:54 PM 01/Jan/2025














