गुहागर : जलजीवन नळपाणी योजनेच्या अर्धवट कामामुळे वेरवली ग्रामपंचायतचे साखळी उपोषण

गुहागर : तालुक्यातील वेरवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जलजीवन मिशन अंतर्गत सार्वजनिक नळपाणी योजनेच्या अपूर्ण कामामुळे बुधवारी सकाळी १० वा. पासून गुहागर पंचायत समिती कार्यालयासमोर वरवेली ग्रामस्थ व वरवेली ग्रामपंचायत सदस्य साखळी उपोषणास बसले आहेत. मक्तेदार प्रत्यक्ष जोपर्यंत उपोषणाच्या ठिकाणी चर्चेला येत नाहीत व नळपाणी योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करणेबाबत तत्काळ प्रत्यक्ष कार्यवाही जोपर्यंत मक्तेदार करत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे. योजना अपूर्ण कामामुळे वारंवार ग्रामपंचायतीमार्फत पाठपुरावा करूनसुद्धा काम पूर्ण होण्याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही.

याबबत गुहागर पंचायत समिती यांना वेळोवेळी कळवण्यात आलेले आहे; परंतु प्रशासनाकडूनही कोणतीही ठोस कार्यवाही अद्याप झालेली नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.

या नळपाणी योजनेचे उर्वरित काम ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्वरित पूर्ण करण्यासंदर्भात संबंधित ठेकेदार व पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही ग्रामस्थांच्या मागणीनुसार काम होत नाही. तसेच जैन इरिगेशनची पाईपलाईन टाकण्यासंदर्भात ग्रामस्थांची मागणी पूर्ण होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

फक्त मुख्य विहीर ते साठवण टाकीपर्यंतच जैन इरिगेशनचा पाईपचा वापर केला आहे. गावांतर्गत पाईपलाईन टाकताना जैन इरिगेशनचा पाईप न वापरता इतर कंपनीचा पाईप वापरला गेला आहे. या संदर्भात अनेक वेळा ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांनी तक्रारी करूनही कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 02/Jan/2025