रत्नागिरी : ज्या विमा कंपन्यांनी शेतकर्यांच्या पिकांबाबत विम्याची नुकसानभरपाई दिलेली नसेल, त्या सर्व विमा कंपन्यांवर शेतकर्यांना फसवल्याचा गुन्हा दाखल करावा, असे निर्देश देत, दिशा समितीच्या बैठकीला दांडी मारणार्या सर्व अधिकार्यांवर कारवाई करावी, असे आदेश खासदार सुनील तटकरे यांनी दिले.
जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रण (दिशा) समितीची बैठक खा. तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खा. नारायण राणे यांच्या सहअध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात गुरुवारी झाली. या बैठकीला आ. शेखर निकम, आ. किरण सामंत, जिल्हाधिकारी एम, देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे उपस्थित होते.
खासदार तटकरे म्हणाले की, दिव्यांगांच्या तसेच वयोश्री योजनेकडे अधिक लक्ष देणे आवश्यक असून, तालुकानिहाय लाभार्थ्यांना दिलेल्या लाभाची माहिती तसेच सद्यस्थिती याची माहिती घेण्यात यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आरोग्य शिबीर घेण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. शेतीसाठी सौरऊर्जेबाबत येथील भौगोलिक स्थिती वरिष्ठांना सांगावी. यांत्रिकीकरणाची योजना पंचायत समितीमार्फत लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावी. अधिकार्यांनी क्षेत्रीय स्तरावर जाऊन सखोल काम करावे. बीएसएनएलच्या कामाबाबत असमाधान व्यक्त करुन ठेकेदारांवर कारवाई करण्याबाबत त्यांनी सूचना केली.
जिल्ह्यात मायनिंग कुठे सुरू आहे, त्यामधून उत्पन्न किती होत आहे, याबाबतची माहिती घ्यावी. पर्यटनाशी निगडित प्रशिक्षण देण्याबाबत कौशल्य विकास विभागाने आराखडा तयार करावा. परंपरागत व्यवसाय, पर्यटन याची सांगड घालून बचत गटांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम घ्या. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधील दर्जेदार कामे करा. अधिकार्यांनी कसोशीने लक्ष घालून अधिक दक्षतेने काम करावे. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी अधिक दक्षतेने अधिकार्यांनी काम करावे, असेही ते म्हणाले.
खा. नारायण राणे म्हणाले की, निर्यात वाढण्यासाठी कोणते उत्पादने आहेत, याबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन करायला हवे. शेतीमधील नवे तंत्रज्ञान, खते, पाणी याबाबतचे नियोजन आदींबाबत कृषी विभागाने शेतकर्यांना मार्गदर्शन करावे.
अधिकार्यांना बक्षीस द्या..
जिल्ह्याचे पर्यायाने राज्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी अधिकार्यांनी मानसिकता बदलून काम करावे. जिल्ह्याची प्रगती करण्यासाठी बुध्दीमत्तेला प्रमाणिकपणाची जोड द्यावी. उद्दिष्टापेक्षा जास्त काम करणार्या अधिकार्यांना बक्षीस द्या, असेही नारायण राणे यांनी नमुद केले.
महामार्गाचे काम 2025 अखेर पूर्ण होईल
मुंबई – गोवा महामार्गाचे काम अनेक वर्ष रखडलेले आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याला अनेक कारणही आहेत, जिल्ह्यातील काम 2025 अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे निर्देश दिले आहेत. याबाबत आपण स्वत: नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे, असे खासदार तटकरे यांनी सांगितले आहे. तसेच कोकण रेल्वेचे विलनीकरण भारतीय रेल्वेत करावे, असा प्रस्ताव करण्यात आला आहे,असे खासदार तटकरे म्हणाले.














