रत्नागिरी : गेली सहा वर्षे मिऱ्या किनारी अडकून पडलेले ‘बसरा स्टार’ जहाज येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामात अडथळा बनलेले आहे. मिऱ्या येथे १९० कोटी खर्च करून गॅबिअन पद्धतीचा बंधारा उभारला जात आहे. बसरा स्टार जहाज काढण्यासाठी – मेरिटाईम बोर्डामार्फत जहाज मालकाला दिलेली मुदतही टळून गेली आहे. त्यामुळे ते जहाज भंगारात काढणे एवढाच पर्याय उरला आहे.
समुद्राच्या उधाणापासून मिऱ्या गावचे संरक्षण करण्यासह या परिसरात पर्यटनाला चालना देण्यासाठी धूपप्रतिबंधक बंधारा उभारण्यात येत आहे. तीन किलोमीटरपैकी पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा टप्पा १,२०० मीटरचे काम शिल्लक आहे. पावसाळा संपल्यानंतर पत्तन विभागाने ३ आठवड्यांपूर्वी ठेकेदाराची बैठक घेतली होती. उर्वरित टप्प्याचे काम सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाने ठेकेदाराला दिल्या होत्या. त्यानुसार कामही सुरू झाले; पण त्या कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासंदर्भात पत्तन विभागाने केलेल्या सर्व्हेमधील सात डेंजर झोनपैकी एक वगळता सर्व टप्प्यांचे काम पूर्ण झालेले आहे; परंतु पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा टप्पा शिल्लक आहे. सुमारे साडेतीन किलोमीटर लांब बंधारा आहे. त्यापैकी अडीचशे मीटरचे काम शिल्लक आहे. त्या कामात अडकलेल्या बसरा स्टार जहाजाचा अडथळा आहे. ते जहाज ३ वर्षे लाटांचा मार खात उभे आहे. त्याची अवस्था बिकट असून, ते भंगारात काढण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. काम सुरू करण्यासाठी प्रशासनाला कडक पावले उचलावी लागणार आहेत.
मेरीटाईम बोर्डाचे पत्र
बसरा स्टारचा जहाज मालक अब्बास सलीम याला मेरिटाईम बोर्डाने २२ फेब्रुवारी २०२४ रोजी पत्र पाठवले होते. त्यामध्ये २५ मार्च २०२४ पर्यंत जहाज काढण्यासाठी मुदतवाढ दिली होती. अजूनही त्यावर हे जहाज मोडीत काढण्याविषयी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्या अडकलेल्या जहाजामुळे स्थानिकांना अडचण होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 04/Jan/2025














