रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे सुरू असलेल्या फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या तीन महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या जनशताब्दी, तेजस, आणि मंगळुरू एक्स्प्रेस या गाड्या आता ३१ जानेवारी २०२५ पर्यंत सीएसएमटीऐवजी ठाणे आणि दादर स्थानकांपर्यंतच धावतील, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.
या निर्णयानुसार, मंगळुरू एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 12134) ठाण्यापर्यंत धावेल, तर सीएसएमटीसाठी अंशत: रद्द केली जाईल. तेजस एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 22120) मडगाव ते दादरपर्यंत चालवली जाईल, तर जनशताब्दी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 12052) देखील मडगाव ते दादरपर्यंतच धावेल. या गाड्या कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याने हा बदल प्रवाशांच्या नियोजनावर परिणाम करू शकतो.
सीएसएमटी येथे सुरू असलेल्या फलाट विस्तारीकरणाचे काम प्रवाशांच्या दीर्घकालीन सोयीसाठी करण्यात येत आहे. या कामामुळे अधिक प्रवासी गाड्यांना स्थानकात सामावून घेता येईल, तसेच प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा सुधारली जाईल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना नियोजन करताना या बदलांचा विचार करण्याचे आवाहन केले आहे.
याशिवाय, रेल्वे प्रशासनाने ३१ जानेवारीपर्यंत या मार्ग बदलांची अंमलबजावणी होईल, असे स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी या बदलांबाबत अधिकृत रेल्वे तिकिट कार्यालये किंवा ऑनलाइन पोर्टलवरून अधिक माहिती घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 04/Jan/2025














