चिपळूण : शहरात वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे वृद्ध आणि विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. ज्या ठिकाणी चार रस्ते एकत्र मिळतात तिथे झेब्रा क्रॉसिंगची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्षा आदिती देशपांडे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे केली आहे.
माजी नगरसेविका देशपांडे यांनी चिपळूण शहरातील वाहतूक समस्येकडे नगर पालिका प्रशासनाचे लक्ष वेधत बुधवारी निवेदन दिले.
शहरात वाढती वाहनांची संख्या तसेच वाढती रहदारी पाहता रस्त्यावरून वृद्ध आणि शाळकरी मुलांना चालणे दिवसेंदिवस अतिशय धोकादायक होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक (चिंचनाका), पाग पॉवरहाऊस, गांधीचौक, बहादूरशेख नाका, संभाजी चौक या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगची व्यवस्था लवकरात लवकर व्हावी जेणेकरून चालत चाणाऱ्या सर्वच नागरिकांचा प्रवास सुखकर होईल, असे देशपांडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
व्हीलचेअरची व्यवस्था असावी शहरातील नारायण तलावाच्या सुशोभीकरणानंतर येथे स्थानिक नागरिक, पर्यटक व तालुक्यातील विविध भागातील लोक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. यामध्ये दिव्यांग मुलांचाही समावेश आहे; मात्र या दिव्यांग मुलांना उचलून घेऊन पालकांना परिसरात फिरावे लागते. त्यामुळे अशा मुलांसाठी अथवा व्यक्तींसाठी या ठिकाणी एका व्हीलचेअरची व्यवस्था करावी, अशी मागणीदेखील देशपांडे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 06/Jan/2025














