रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलात प्रशिक्षित जवान फारच कमी आहेत. शहरात मोठमोठ्या इमारती विकसित होत आहेत. अशावेळी अग्निशमन जवानांची संख्या कमी असणे धोकादायक आहे. त्यामुळे येथे 15 दिवसांत प्रशिक्षित जवानांची भरती न केल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपचे नेते तथा माजी नगरसेवक उमेश कुलकर्णी, राजू तोडणकर आणि मुन्ना चंवडे यांनी दिला आहे. यासंदर्भात र.न.पचे उपमुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेची अग्निशमन दलाची इमारत झाली आहे. दोन अद्यावत अग्निशामक आणि दोन अग्निशामक बुलेट किंवा दुचाकी आहेत. इतकी सर्व यंत्रणा असतानाही केवळ दोन अग्निशामक जवान कार्यरत आहेत. त्याचबरोबर एकच अग्निशामक चालक कायमस्वरुपी आहे. ही परिस्थिती विकसित होत जाणार्या शहराला धोकादायक असल्याचे उपमुख्याधिकार्यांना भाजप नेते कुलकर्णी, तोडणकर आणि चवंडे यांनी पटवून दिली.
रत्नागिरी शहरातील एखाद्या इमारतीत आग लागण्याची दुर्घटना घडल्यास आणि अग्निशामक चालक आयत्यावेळी उपलब्ध न झाल्यास मोठा अनर्थ घडण्याची भीती आहे. अशावेळी तातडीने अग्निशामक जवान भरती करावी. पुढील पंधरा दिवसांत या संदर्भात उपेक्षित निर्णय न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या भरतीच्या मागणीचे निवेदन देताना माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर, माजी नगरसेविका प्रणाली रायकर, सुप्रिया रसाळ, मानसी करमरकर, माजी नगरसेवक समीर तिवरेकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 06-01-2025














