संगमेश्वर : मुंबईतील आर्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे घेण्यात येणाऱ्या १०७ व्या ऑल इंडिया आर्ट स्पर्धेत सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या स्वराज कदमने बाजी मारली आहे. त्याने केलेल्या नवगुंजार या शिल्पाची निवड झाली आहे. या स्पर्धेत निवड होणे हे विद्यार्थी कलाकार म्हणून खूप महत्त्वाचे मानले जाते. यावर्षी हे प्रदर्शन मुंबई येथील प्रसिद्ध जहांगीर कलादालनात १८ ते २४ स्वराज कदम फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.

शिल्प निर्मिती करताना माझ्या मनात विविध विचारांचे काहूर होते. हे सर्व विचार एकत्र करून केलेली शिल्प निर्मिती म्हणजे नवगुंजार होय. कलाकृती साकारत असताना कलाकार कधीही पारितोषिकाचा विचार करत नाही. आपलं अंतर्मन जागृत केल्यानंतर हातातून जे साकारते ते प्रथम आपल्याला समाधान आणि आनंद देणारे असेल तर नक्कीच ती कलाकृती कलारसिकांना भावते आणि आनंद देते, हा आपला अनुभव असल्याचे स्वराजने सांगितले. नवगुंजार या शिल्पाची आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रदर्शनात निवड होईल, असे वाटले नव्हते.
यासाठी प्राचार्य माणिक यादव आणि शिल्पकलेचे प्रा. रूपेश सुर्वे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. सह्याद्री शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सचिव महेश महाडिक, ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, पूजा निकम, प्राचार्य माणिक यादव आदींनी त्याचे कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 06/Jan/2025














