संगमेश्वर : शहर परिसरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या रक्ताला चटावलेला बिबट्या भक्ष्य शोधार्थ संगमेश्वर शहरात दाखल झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एका पाळीव कुत्र्याची शिकार करण्याचा बिबट्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याचा प्रकार पुढे आला आहे. तर दोनच दिवसांपूर्वी शहरात मुक्तपणे भटकंती करणाऱ्या बिबट्याचा व्हिडिओ एका चारचाकी चालकाच्या गाडीतील कॅमेऱ्यात चित्रबद्ध झाला आहे.
गेले काही दिवस संगमेश्वर शहर तसेच संभाजी नगर भागात बिबट्या फिरत असल्याची चर्चा होती. भूक भागवण्यासाठी मोकाट फिरणाऱ्या जनावरांची शिकार करण्यासाठी फिरणाऱ्या बिबट्याचे दर्शन अनेकांना झाले होते.
गेल्या काही महिन्यांमध्ये शहर परिसरातील मोकाट कुत्र्यांची संख्याही कमी झाली होती. आयते खाद्य मिळत असल्यामुळे विबट्याने संगमेश्वर परिसरातच डेरा टाकला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गापलीकडे डोंगरावर वसलेल्या संभाजी नगर येथील दादू कुष्टे यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. मात्र, त्याची शिकार करण्यात तो अयशस्वी ठरला. या हल्ल्यात कुत्रा जखमी झाला. हा प्रकार समोर आल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यात संगमेश्वर येथील नागरिक चारचाकीने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून पोस्ट कार्यालयाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याने शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जात होते. त्यांच्या गाडीच्या आवाजाने बिबट्याने रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला धूम ठोकली. हे दृश्य त्यांच्या गाडीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळे शहरातून राष्ट्रीय महामार्ग ओलांडून संभाजी नगरपर्यंत बिबट्याचे सुरू असलेले वावरणे नागरिकांसाठी धोकादायक बनलेले आहे.
रात्रीची वर्दळ कमी झाली
बिबट्याच्या दहशतीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. काही वाहन चालकांनाही बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकारामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यावरील रात्रीची वर्दळ सुद्धा रोडवू लागली आहे. त्या बिबट्याचा बंदोबस्त करा, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 06/Jan/2025














