चिपळूण : आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका येत आहेत. त्यात महायुती म्हणून आपण एकत्र राहिले पाहिजे. महायुतीच्या वरिष्ठस्तरावरील सर्वच पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन संपूर्ण जिल्ह्यात हा महायुतीचा पटर्न राबवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले.
चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील राधाताई लाड सभागृहात शनिवारी (ता. ४) झालेल्या महायुती नियोजन समिती व हितचिंतकांच्या आभार व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी आमदार निकम म्हणाले, प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, संकल्प वेगळे असते. कारण निवडणुकीत समोरचा उमेदवारदेखील त्याच ताकदीने उत्तरत असतो. अशाही स्थितीत तुम्ही
सर्व जणं ठाम राहून निवडणुकीत विकासकामांच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचलात. त्यामुळेच हे यश मिळू शकले, निवडणुकीत मिळालेल्या कमी मताधिक्याचे हेवे दावे करत बसण्यापेक्षा आपण आपले काम करत ते लोकापर्यंत येऊल गेले पाहिजे. चिपळूण शहराने २०१९ च्या निवडणुकीत ८ हजारांचे मताधिक्य दिले होते. त्याची जाणीव आपल्याला आहे. आताची परिस्थिती वेगळी होती, माझ्याबद्दल काही समज गैरसमज पसरवण्याचे काम झाले. अशाही स्थितीत चिपळूण शहराने जी साथ दिली त्यात मिळालेल्या विजयात या शहराचा वाटा महत्वाचा आहे. निवडणुका झाल्या आता अडीच वर्षांनंतर मंत्रिपद मिळेल या सर्व जर तरच्या गोष्टी असतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. विधानसभा निवडणूक पहिल्यापासूनच आव्हानात्मक होती. निवडणूक प्रचारादरम्यान आपली विकासकामे महायुतीचे सर्वच कार्यकर्ते मतदारांपर्यंत घेऊन गेले, त्यांच्या या मेहनतीमुळेच आव्हानात्मक असलेल्या या निवडणुकीत आपला विजय झाला आहे. माझ्या गावात कोट्यवधीची कामे करूनदेखील मताधिक्य कमी झाले याची कारणे शोधली पाहिजे. सकारात्मक आहे ते पुढे घेऊन जाण्याची आपली भूमिका ठरवली पाहिजे.

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील रणनीतीविषयी ते म्हणाले, महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल, त्यावेळची परिस्थिती कशी असेल हे कोणीच सांगू शकत नाही. आमदारकीच्या वेळी जसा महायुतीचा उमेदवार निवडून आणलात त्या पद्धतीने कोणतीही कुजबुज न करता जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याला निवडून आणायाचा आपला प्रयत्न हवा. आपला स्पर्धक असला तरी त्याला नमस्कार करण्याची भूमिका ठेवली पाहिजे. निश्चितपणे यातून आपल्याला यश मिळेल. जेवढी प्रामाणिकपणाने कामे करता आली तेवढी केली.
यापुढेही ती करत राहणार, चिपळूण शहर पूरमुक्त, तलाव, ग्रॅव्हीटी योजना, पर्यटन, कला-क्रीडा, पाझर तलाव, पाणी योजना यासारखी कामे मतदार संघात करायची आहेत. त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, त्याची ग्वाही देतो, असे त्यांनी सांगितले.
या मेळाव्याला माजी आमदार विनय नातू, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, नितीन उसाळे, संदेश आयरे, उमेश सकपाळ, विजय चितळे, रामदास राणे, पूजा निकम, दिशा दाभोळकर, सुरेखा खेराडे, किशोर रेडीजे, जयंद्रध खताते, अशोक कदम, किशोर रेडीज, राम शिंदे, सुरेश खापले, साधना बोत्रे, आदिती देशपांडे, मिलिंद कापडी उपस्थित होते.
… तरच मंत्रिपदाची स्वप्न पाहू
नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती जर का आपल्याकडे आल्या तरच मंत्रिपदाची स्वप्न बघायला हरकत नाही. त्यासाठी आपण एकत्रपणे काम केले तर हे शक्य आहे ज्या ज्या ठिकाणी आपण मागे आहोत तेथे आत्मचिंतन करून तिथे तिथे सुधारणा केली पाहिजे. त्यासाठी त्याची तयारी आतापासूनच केली पाहिजे, असे आमदार निकम यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:54 PM 06/Jan/2025














