चिपळूण : घरफोडी करणाऱ्या चोरट्याच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

चिपळूण : पिंपळी-खुर्द येथे गुरुवारी भरदिवसा घर फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने असा २ लाखाचा मुद्देमाल चोरून नेला होता. चोरट्याच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा गतीमान झाली असून त्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

संतोष शंकर रिळकर यांचे पिंपळी-खुर्द येथे घर असून त्या घराच्या दरवाजाची जाळी अज्ञात चोरट्यांनी लोखंडी सळी व कोयतीच्या सहाय्याने तोडून दरवाजा उघडला. त्यानंतर घरात प्रवेश करून देवघरातील लोखंडी कपाटामधील दागिने व ३८ हजार रुपयांची रोकड असा १ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. हा प्रकार संतोष रिळकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या चोरीच्या घटनेनंतर श्वानासह ठसे तज्ञ पथकास पाचारण करण्यात आले होते. यावेळी श्वान त्या परिसरात घुटमळत राहिला. चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा गतीमान झाली. त्यासाठी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. यातूनच पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:00 PM 06/Jan/2025

Aayurzil