वृत्तपत्र लोकशाहीचा आधारस्तंभ : न्या. डॉ. अनिता नेवसे

चिपळूण : आधुनिक काळात प्रसारमाध्यमांचा समाज जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. नवीन तंत्रज्ञानाच्या युगात वृत्तपत्रे महत्वाची भूमिका बजावत आहेत. वृत्तपत्र स्वातंत्र्य ही व्यापक संकल्पना आहे. समाजात घडणार्‍या दोन्ही बाजू समोर यायला हव्यात. वृत्तपत्रे ही लोकशाहीचा मोठा आधारस्तंभ आहे. त्यातून लोकांच्या अन्यायाला वाचा फुटते, असे प्रतिपादन चिपळूण येथील आयोजित कार्यक्रमात येथील जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले.

चिपळुणातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर सभागृहात वाचनालय, पत्रकार संघ, चिपळूण व तालुका विधी सेवा समिती चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे जिल्हा सत्र न्यायाधिश डॉ. नेवसे यांच्या हस्ते जांभेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, मुख्याधिकारी विशाल भोसले, सरकारी वकिल अ‍ॅड. चिन्मय दिक्षीत, वाचनालयाचे अध्यक्ष यतीन जाधव, पत्रकार संघाचे अध्यक्ष नागेश पाटील, पत्रकार राजेंद्र शिंदे, आदी उपस्थित होते. पत्रकार समीर जाधव यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी डॉ. नेवसे म्हणाल्या, मराठी वृत्तपत्रे 193 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक मार्गदर्शक न्यायनिर्णयांनी वृत्तपत्र स्वातंत्र्याचा अधिकार हा नागरिकांच्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मान्य केला आहे. वृत्तपत्रांना स्वातंत्र्य असले तरी काहीही छापण्याचा अधिकार नाही. वृत्तपत्र व्यवसायासंबंधीचे कायदे, वृत्तपत्र व पुस्तके नोंदणी कायदा 1867 पासून ते महाराष्ट प्रसार माध्यमातील व्यक्ती व प्रसार माध्यम संस्था अधिनियम 2017 च्या कायद्यापर्यंतची माहिती दिली. शासनाकडून अधिकृतरित्या प्राप्त न झालेली व शोधपत्रकारितेचा उपयोग करून मिळवलेली गोपनीय माहिती वृत्तपत्रांनी प्रसिध्द केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. फसवणक करणा-या जाहिरातींविरूध्द ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतूदीनुसार ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने कारवाई होऊ शकते.

वृत्तपत्र स्वातंत्र्य हे लोकशाहीचा एक मोठा आधारस्तंभ असल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आणले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांनी निर्देशित केलेल्या जेष्ठ नागरिक, पिडीत महिला, अपंग व्यक्ति व बालके यासंबंधीच्या विविध योजना अंमलात आणण्याकरीता आज विविध स्तरांवर न्यायसंस्था, शासन संस्था, विविध सामाजिक संस्था कार्यरत आहेत. पत्रकारांनी सर्वसामान्य नागरिक आणि या विविध यंत्रणा यामधील समन्वयक होवून सामाजिक बांधिलकी स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने म्हणाले, वृत्तपत्रांनी थेट न्याय देण्याची भूमिका बजावू नये. स्पर्धेच्या युगात पत्रकारिता वेगळ्या वळणावर जात आहे. पत्रकारांनी दोन्ही बाजूंची वस्तूस्थिती पाहून खरी बातमी द्यावी. पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले म्हणाले, पत्रकार हे लोकशाहीचा एक स्तंभ आहे. समाजाभिमूख पत्रकारितेला प्राधान्य द्यायला हवे. एआयसारख्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा.

यावेळी वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, धीरज वाटेकर, प्रसिद्धन प्रवचनकार धनंजय चितळे, सामाजिक कार्यकर्ते बापू काणे, विनायक ओक, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, यांच्यासह वाचनालयाचे पदाधिकारी, पत्रकार संघाचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 07-01-2025