राजन साळवींनी आरोपांचे ढोल वाजवणे बंद करावे : चंद्रप्रकाश नकाशे

रत्नागिरी : राजापूरचे माजी आमदार राजन साळवी जे आरोप करत आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत. त्यांनी आत्मपरीक्षण करावे. लोकसभेला माजी खासदार विनायक राऊत यांना २१ हजारांचे मताधिक्य मिळते, तर मग तुम्हाला का मिळत नाही? त्यामुळे राजन साळवींनी अशी वक्तव्यं करायला नकोत, या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे चुकीच्या तक्रारी करणे योग्य नाही. साळवींनी आता असे ढोल वाजवणे बंद करावे, अशी प्रतिक्रिया चंद्रप्रकाश नकाशे यांनी दिली.

राजापूर-लांजाचे माजी आमदार हे सध्या ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करून भाजप प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. साळवी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते विनायक राऊत, जिल्हाप्रमुखांवर विधानसभा निवडणूक पराभवावर नाराजी व्यक्त केली आहे. राऊत निष्ठावंत असून, त्यांच्या हातून असे घडणार नाही. साळवी जे आरोप करत आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत. दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा ज्याने त्याने विधानसभा निवडणुकीत आपला पराभव का झाला, याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचे नकाशे यांनी म्हटले आहे.

‘ते पक्षहिताचे काम करणार’
नकाशे म्हणाले, ‘विनायक राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. ते पक्षहिताचे काम करणार. पक्षसंघटनेसाठी हे कधीही चुकीचे काम करणार नाहीत. कुठल्याही अहिताचे काम करून पक्ष संघटनेला बाधा आणणार नाहीत. माजी खासदार विनायक राऊत हे निवडणुकीत उभे राहिलेल्या आपल्या उमेदवाराविरोधात चुकीचे काम करणार नाहीत. अटीतटीच्या या लढतीमध्ये एक आमदार कमी होणे, हे कोणत्याही पक्षाला परवडणारे नाही. त्यामुळे ते असे करू शकत नाहीत.’

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 07/Jan/2025