साखरप्यातील अडीच लाखांच्या चोरी प्रकरणातील फरार मायलेकींना अखेर बेड्या: देवरूख पोलिसांची दीड वर्षांनंतर धडक कारवाई

सुर्वेवाडीतील बंद घराच्या विश्वासाचा गैरफायदा घेत लांबवले होते सोन्याचे दागिने; न्यायालयाने सुनावली २ दिवसांची पोलीस कोठडी

साखरप्यातील चोरी प्रकरणातील फरार मायलेकींना बेड्या ठोकण्यात देवरूख पोलिसांना मोठे यश आले आहे. साखरपा परिसरातील सुर्वेवाडी येथे घडलेल्या सुमारे अडीच लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या या संशयित मायलेकींना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दीड वर्षानंतर झालेल्या या अटकेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अन्नपूर्णा दिगंबर बने (वय ५६) आणि त्यांची मुलगी शरयू दिगंबर बने (वय २५, दोघी रा. सुर्वेवाडी, साखरपा) असे अटक करण्यात आलेल्या संशयित मायलेकींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, सुर्वेवाडी येथील रहिवासी सरिता सुरेश सुर्वे यांनी आपल्या नातेवाईक आणि शेजारी राहणाऱ्या या बने मायलेकींवर विश्वास ठेवून आपल्या घराच्या चाव्या त्यांच्याकडे दिल्या होत्या. मात्र, संशयित मायलेकींनी या विश्वासाचा गैरफायदा घेत बंद घरातून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच सरिता सुर्वे यांनी देवरूख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच अटकेच्या भीतीने या मायलेकी दीड वर्षांपूर्वीच गावातून फरार झाल्या होत्या.

दीड वर्षांनंतर पोलिसांच्या जाळ्यात; दोन दिवसांची पोलीस कोठडी

गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या मायलेकींचा देवरूख पोलिसांचे विशेष पथक सातत्याने शोध घेत होते. अखेर शनिवारी पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे या दोघींना ताब्यात घेण्यात यश आले.

अटक केल्यानंतर संशयितांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चोरीला गेलेला अडीच लाखांचा सोन्याचा मुद्देमाल त्यांनी कुठे लपवला आहे आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा छडा लावण्यासाठी पोलीस कोठडीत त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नामदेव जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:37 20-07-2026