रत्नागिरी जिल्ह्यात ७४० ग्रामपंचायतींमध्ये बसवणार पर्जन्यमापक यंत्रणा; पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

आंबा-काजू विमा स्वस्त, ‘मागेल त्याला काजू’ योजना सुरू

८८ कोटींचे विमा वाटप, ‘सिंधुरत्न’मधून रायपनिंग चेंबर्स अन् कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होणार

रत्नागिरी जिल्ह्यात ७४० ग्रामपंचायतींमध्ये पर्जन्यमापक यंत्रणा बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोकणातील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या आंबा, काजू आणि इतर फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत या कोट्यवधी रुपयांच्या विविध योजनांची घोषणा केली.

हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींमुळे संकटात सापडलेल्या कोकणी शेतकऱ्याला या निर्णयामुळे मोठा आधार मिळणार असून, जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला आधुनिकतेची जोड देण्याचा मानस पालकमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

आंबा-काजू विमा हप्ता स्वस्त आणि ‘मागेल त्याला काजू’ योजना

  • विमा हप्त्यात मोठी कपात: सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा फळपीक विम्याचा शेतकऱ्यांचा हप्ता प्रति हेक्टर १३,६०० रुपयांवरून ८,५०० रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५,१० वरून ८,५०० रुपयांपर्यंतची मोठी बचत होणार आहे.
  • विमा कालावधी वाढवला: विमा संरक्षणाचा कालावधी १५ मे ऐवजी ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. याशिवाय प्रथमच नारळ आणि सुपारी या पिकांचाही फळपीक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे.
  • ‘मागेल त्याला काजू’ योजना: पूर्व लागवड योजनांचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू झाली आहे. यासाठी ४ लाख मोफत काजू कलमे उपलब्ध करून देण्यात येणार असून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ५० कलमे मिळतील. यामुळे जिल्ह्यात सुमारे २ हजार हेक्टरवर नवीन काजू लागवड होणार असून भविष्यात १०० कोटी रुपयांहून अधिक आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे.

८८ कोटींचा विमा निधी आणि सिंधुरत्न योजना

अवकाळी हवामान व कडाक्याच्या थंडीमुळे आंबा-काजूचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर मागील वर्षाच्या फळपीक विम्यापोटी जिल्ह्याला ८८ कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला असून त्याचे वितरण सुरू आहे. याचा लाभ जिल्ह्यातील २८ ते ३० हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.

तसेच, आंबा काढणीनंतरची प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजने’तून २ टन क्षमतेचे ‘मॅंगो रायपनिंग चेंबर्स’ उभारण्यात येणार आहेत.

भात, नाचणी विमा अन् AI आधारित शेती

  • भात व नाचणी विमा: भातासाठी ६५० रुपये प्रति हेक्टर तर नाचणीसाठी ४०० रुपये प्रति हेक्टर प्रीमियम असून, नुकसान झाल्यास अनुक्रमे ६० हजार आणि ४० हजार रुपये प्रति हेक्टर भरपाई मिळू शकते. विम्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.
  • कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रकल्प: आंबा व काजू उत्पादन वाढीसाठी रत्नागिरीत एआय (AI) आधारित पायलेट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. २४ क्लस्टर विकसित करून सुमारे ५०० शेतकऱ्यांच्या सहभागाने हे तंत्रज्ञान वापरले जाईल.
  • काजू बोंडावर प्रक्रिया: काजू बोंडावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यासाठी शेतकरी व महिला बचत गटांना प्रोत्साहन दिले जाणार आहे, ज्यामुळे उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:44 20-07-2026