Dapoli: मळे-झगडपुरी येथे नदीकाठची जमीन खचली: दापोली तहसील प्रशासनाकडून पंचनामा आणि प्रत्यक्ष पाहणी सुरू

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

मळे-झगडपुरी येथे नदीकाठची जमीन खचल्याची चिंताजनक घटना दापोली तालुक्यात शुक्रवारी (१७ जुलै) रोजी उघडकीस आली आहे. दापोली तालुक्यातील मौजे मळे-झगडपुरी येथील नदीकिनारी अचानक जमीन खचून मोठे तडे पडल्याची प्राथमिक माहिती ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून तहसील प्रशासनाला प्राप्त झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाने तातडीने हालचाली सुरू करत संबंधित ठिकाणी पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

या घटनेबाबत दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी अधिकृत माहिती देताना सांगितले की, मौजे मळे-झगडपुरी येथील नदीकाठची जमीन खचल्याबाबत ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाला असून घटनास्थळाचा पंचनामा केला जात आहे.

सध्या तरी या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांना किंवा नदीकाठच्या परिसराला कोणताही थेट धोका निर्माण झालेला नाही. शनिवारी (१८ जुलै) रोजी तहसील प्रशासनाकडून या संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली जाणार असून, संपूर्ण परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाईल. त्यानंतर आवश्यक असणारी पुढील प्रशासकीय कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

घटनेची गंभीरता ओळखून महसूल विभागाने संपूर्ण परिसरावर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याने नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनात्म उद्गार तहसीलदार अर्चना बोंबे यांनी काढले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:37 20-07-2026