मुलीचा शोध लागल्यानंतर गुन्हा नोंद; दोघे अटकेत
अल्पवयीन मुलीवर रत्नागिरीत लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी गावातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला रत्नागिरी येथे आणून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या गंभीर प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना १५ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली. १४ जुलै रोजी दुपारी मुख्य आरोपी कृष्णा अच्युत फड (वय १८) याने पीडित मुलीशी संपर्क साधून ‘रात्री एक वाजता महत्त्वाचे बोलायचे आहे’ असे सांगून बोलावून घेतले होते. ठरल्याप्रमाणे १५ जुलै रोजी पहाटे एक ते दोनच्या सुमारास मुलगी त्याला भेटण्यासाठी गेली.
यावेळी कृष्णा फड याने तिला मोटारसायकलवरून रेल्वे फाट्यापर्यंत नेले. तिथे आधीच चारचाकी गाडी घेऊन थांबलेला सह-आरोपी गणेश बसुराज फड (वय २०) याने दोघांना कारमध्ये बसवले. प्रवासादरम्यान पीडित मुलीने विरोध केला असता आरोपींनी तिला धमकावून गप्प बसवले. यानंतर आरोपींनी मुलीला रत्नागिरी येथे आणले, जिथे मुख्य आरोपी कृष्णा फड याने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
बेपत्ता नोंदीनंतर पोक्सो अन् बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल
सुरवातीला या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, १८ जुलै रोजी पीडित मुलीचा शोध लागल्यानंतर पोलिसांनी तिचा सविस्तर जबाब नोंदवला.
मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्ह्यामध्ये कलम वाढ करत गुन्हा नोंद क्रमांक ४८७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम १३७(२), ६४(२), ३(५) तसेच पोक्सो कायद्याचे (POCSO) कलम ४ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:37 20-07-2026














