गुहागर : महावितरण कार्यालयात वायरमनचं ठिय्या आंदोलन

गुहागर : महावितरणच्या शृंगारतळी शाखेंतर्गत तीन वायरमन कर्मचाऱ्यांची बदली केल्याचा जाब विचारत सोमवारी (ता. ६) गुहागर महावितरण कार्यालयात वायरमन कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत चिपळूण कार्यकारी अभियंत्यांकडून कोणताच निर्णय दिला गेला नव्हता. त्यामुळे आंदोलन उशिरापर्यंत सुरूच होते.

महावितरणच्या गुहागर तालुक्यातील शृंगारतळी शाखेतर्गत काम करणारे वायरमन विश्वजित चव्हाण, अल्पेश मोरे, किरण बेदरकर या तिघांची गावांतर्गत बदल्या केल्या त्या अन्यायकारक असल्याचे वायरमन यांचे म्हणणे आहे. एका शाखेतून दुसऱ्या शाखत अशा बदल्या नुकत्याच झाल्या असताना गावांतर्गत बदली ही वायरमनना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचे सर्व वायरमन यांचे म्हणणे आहे. याचा जाब विचारण्याकरता उपकार्यकारी अभियंता सुनील सुद यांची सर्व वायरमन यांनी भेट घेतली.

अभियंता सचिन कोळेकर यांनी ग्राहकांची वीज वसुली १०० टक्के व्हावी याकरता ही बदली केली असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती सुनील सुद यांनी दिली. मात्र कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार दोन्ही बाजू ऐकून घेऊन चिपळूणचे कार्यकारी अभियंता अनिल गेडाम यांच्याकडे सदर प्रकरणी मार्गदर्शन मागवले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत कार्यकारी अभियंता यांनी कोणताही निर्णय दिलेला नव्हता.

वीज वसुलीच्या नावाखाली बदली केली असेल तर गेली दोन वर्षे गुहागर तालुका १०० टक्के वीज वसुली झाली आहे. प्रभारी सहायक अभियंता सचिन कोळेकर हे वीज वसुती संदर्भात वायरमन यांना कोणते सहकार्य करत नाहीत. अंतर्गत बदल्यांनी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. शाखेंतर्गत बदलीनंतर नवीन कर्मचाऱ्याला तेथील फिडर लाईन समजून घेण्यासाठी सहा महिने जातात, मात्र अवघ्या दीड महिन्यात बदल्या अन्यायकारक आहेत.- महेश डिंगणकर, सचिव, वर्कर्स फेडरेशन रत्नागिरी मंडळ

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 07/Jan/2025