मुलांच्या मौखिक आरोग्याकडे पालकांनी लक्ष द्यावे : डॉ सतीश गवाळे

चिपळूण : शालेय स्तरावरती विद्यार्थ्यांची वेळोवेळी मौखिक आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. आरोग्याच्या इतर समस्या बरोबरच मौखिक आरोग्य सुद्धा निरोगी ठेवणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

दातांना कीड लागणे किंवा हिरड्यातून रक्त येणे या समस्या ज्यामुळे उद्भवतात त्या गोष्टींचे आकलन करून दूर करण्यासाठी पालकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत दंत चिकित्सक शिबिरात उपजिल्हा रुग्णालय कामठे येथील दंत चिकित्सक डॉ. सतीश गवाळे यांनी व्यक्त केले.

चिवेली पंचक्रोशी विकास मंडळ संचालित आदर्श विद्यामंदिर चिवेली येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. गवाळे बोलत होते.
या कार्यक्रमाच्या वेळी आदर्श विद्यामंदिर चिवेलीचे चेअरमन संतोष भाई कुळे, शाखा समिती अध्यक्ष सुभाष शिर्के, शाळेचे मुख्याध्यापक संजय चव्हाण, उपजिल्हा रुग्णालयातील सौ प्रीतम कारंडे, स्वाती वाघमारे, श्री शिंदे उपस्थित होते.

यावेळी डॉ. गवाळे म्हणाले की, मुलांचे आरोग्य निरोगी ठेवणे गरजेचे आहे . लहानपणी किंवा शालेय स्तरावर मुलांना काही खाण्याची सवय असते. जंक फूड्स, चिकट पदार्थ ,गोड पदार्थ मुले आवडीने खात असतात. मात्र तोंडाची काळजी घेत नाहीत. अशावेळी दाताना कीड लागण्याचा संभव असतो. तोंडाला वास येणे आणि तोंड येणे अशा समस्या उद्भवतात.

Ratnagiri Khabardar add image

त्यामुळे रोज सकाळी व रात्री दोनदा ब्रश करणे महत्त्वाचे आहे. दर सहा महिन्यांनी दातांची नियमित तपासणी डॉक्टरांकडून करून घेतली तर निश्चितच दातांच्या समस्या पासून सुटकारा मिळू शकतो. लहान मुलांचे दात तोंडात उगवल्यानंतर ते साधारण पाच वर्षापर्यंत मुलांची दात घासण्याकडे पालकांनी लक्ष द्यावे. त्यांना भरपूर प्रमाणात फळे तंतुमय पदार्थ आणि भाज्या खायला दिल्या पाहिजेत. तीन महिन्यानंतर टूथ ब्रश बदलले पाहिजे ,अशा सूचना त्यांनी या शिबिराच्या वेळी केल्या.

या नंतर शिबिरामध्ये इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 33 विद्यार्थ्यांना सर्व काही प्रमाणात दाताचे समस्यांचा प्रॉब्लेम असल्याचे निष्पन्न झाले आहे. उपजिल्हा रुग्णालय कामथे येथील डॉ. सतीश गवाळे व सौ प्रीतम कारंडे यांनी तपासणी केली. मुलांची तपासणी केल्याबद्दल संस्थेच्या वतीने अध्यक्ष राजेश शिर्के, प्रमुख कार्यवाह रमेश शिर्के, चेअरमन संतोष भाई कुळे, शाखा अध्यक्ष सुभाष शिर्के मुख्याध्यापक संजय चव्हाण यांनी आभार मानण्यात आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:24 07-01-2025