रत्नागिरी : ‘HMPV’बाबत जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

◼️ ‘एचएमपीव्ही’बाबत सूचनांचे पालन करा : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी : चीनमधून आलेल्या नवीन विषाणूबाबत (एच. एम.पी.व्ही.) चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून, नाहक भीतीचे वातावरण पसरू नये व सर्व नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.

चीनमध्ये सध्या एचएमपीव्हीचा उद्रेक झाल्याचे वृत्त आहे. मानवी मेटान्युमोव्हायरस (एच.एम.पी. व्ही.) हा तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण बनलेला आहे. हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे व श्वसनमार्गावरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो. भारतातही या विषाणूचे काही प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. त्या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिकांमध्ये या आजाराबाबत भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये आणि विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. ६) सायंकाळी बैठक झाली.

त्या वेळी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड, मुख्याधिकारी तुषार बाबर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसन संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नागरिकांना खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रूमाल किंवा टिश्यू पेपरने झाका. सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा, ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून लांब राहा. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेन्टिलेशन होईल, याची दक्षता घ्या. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा. हस्तांदोलन, आजारी लोकांशी जवळचा संपर्क, टिश्यू पेपर आणि रूमालाचा पुनर्वापर, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे, सार्वजनिक ठिकाणी धुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे या गोष्टी करू नयेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 08/Jan/2025