चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाणे खुर्द ग्रामपंचायतीत सन २०२३-२४ मध्ये एकही ग्रामसभा घेण्यात आलेली नाही. शासनाने ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेणे बंधनकारक केले आहे. ग्रामसभा न झाल्याने त्याचा गावच्या विकासकामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे ग्रामसभा न घेणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सीईओंच्या सूचनेनंतरही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
तालुक्यातील मार्गताम्हाणे खुर्द येथील ग्रामसभेचा मुद्दा सातत्याने गाजतो आहे. ग्रामपंचायतीना वर्षातून चारवेळा ग्रामसभा घेण्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर एखाद्या विशिष्ठ विषयावर निर्णय अथवा मान्यता देण्यासाठी ग्रामपंचायत सरपंचांना ग्रामसभा घेण्याचे अधिकार आहेत; मात्र मार्गताम्हाणे खुर्द येथे नोव्हेंबर २०२३ नंतर एकही ग्रामसभा घेण्यात आलेली नाही. ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या ग्रामसभेत वादळी चर्चा झाली होती. ग्रामसभा न झाल्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी सरपंचांना विचारणा केली. त्यावर रजेवर असल्याचे आणि तब्येत बरोबर नसल्याचे स्पष्टीकरण सरपंचांनी दिले. सरपंच नसताना उपसरपंचांनी ग्रामसभा घेण्याची आवश्यकता होती; मात्र त्यांनीही ती घेतली नाही.
यावरून ग्रामस्थांनी सचिव असलेल्या ग्रामसेवकांना विचारणा केली. त्यावर ग्रामसेवक म्हणाले, ग्रामसभेसाठीचा अजेंडा काढला होता; मात्र रजेवर जाणार असल्याने व तब्येत सुस्थितीत नसल्याने उपसरपंचाची स्वाक्षरी घेण्याची सूचना सरपंचांनी केली. उपसरपंचाची स्वाक्षरी घेतल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून तो ग्रामस्थांच्या माहितीसाठी देण्यात आला; मात्र त्याचवेळी आपणही रजेवर जाणार असल्याचे कारण देत उपसरपंचानी सभेची निमंत्रण पत्रिका मागे घेतली. यावरून जोरदार चर्चा झाली विविध कारणे दिली तरी ग्रामसभा न झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. ग्रामसभा न होण्यामागे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक जबाबदार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. या तिघांवर ग्रामपंचायत अधिनियमानुसार कारवाई करण्यात यावी, असा ग्रामसभेत ठराव देखील करण्यात आला.
याबाबत ग्रामपंचायत विस्तार अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे; मात्र त्याबाबतची नेमकी माहिती ग्रामस्थांना मिळालेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर राजेंद्र कोतवडेकर, दत्ताराम ताम्हणकर, दिनकर सुर्वे, देवीदास चव्हाण, दिलीप पवार, दीपक चव्हाण, हनुमंत चव्हाण, सुनील चव्हाण आदींनी सह्या केल्या आहेत.
सखोल चौकशीची मागणी
ग्रामसभा न घेण्याबाबत विविध कारणे दिली गेली आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 08/Jan/2025












