नियम पाळा म्हणजे अपघात टाळता येतील : पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गमरे

सावर्डे : मानवी जीवन अमूल्य आहे. शालेय वयात अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा. कोणतीही आधुनिक यंत्रे वापरताना सावधानता पाळा. अठरा वर्षांनंतरच वाहने चालवा. योग्य परवाना घ्या. बेफिकीरपणा करू नका कारण आपल्या आई, वडिलांनी आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहिलेले असतात. त्या दृष्टीने आतापासूनच प्रयत्नशील राहा. नेहमी नियम पाळा म्हणजे अपघात टाळता येतील, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गमरे यांनी केले.

सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या पोलीस बांधवांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रेझिंग डे साजरा करण्यात आला. यावेळी सावर्डे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गमरे, भूषण सावंत, पोलिस हवालदार संतोष कदम, होमगार्ड कदम व पोहवा, प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक भूषण सावंत व संतोष कदम यांनी विद्यार्थ्यांना ७६२ एसेला व ९ एमएम कार्बन मशीन या बंदुकींची माहिती देताना त्यांचे टार्गेट, वजन, मशीन चालवताना घ्यायची काळजी, बंदकीच्या विविध भागांची ओळख करून दिली. निवेदन अशोक शितोळे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 08/Jan/2025